‘कम्युनिटी ट्रान्समिशन’ होण्याची दाट शक्यता……!
नवी दिल्ली दि.५ – देशात पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक होत असताना पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये कडक निर्बंध लागू केले आहेत. काही ठिकाणी मिनी लॉकडाऊनची घोषणा प्रशासनातर्फे करण्यात आली असून कोरोना रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. AIIMS चे प्रमुख आणि कोव्हिड टास्क फोर्सचे सदस्य डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी वाढत्या कोरोनाबाबत चिंता व्यक्त करत एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे.
कोव्हिड टास्क फोर्सचे महत्वाचे सदस्य आणि AIIMS चे प्रमुख असलेले रणदीप गुलेरिया यांनी कोरोना रोखण्यासाठी देशभरात मायक्रो लॉकडाऊन गरजेचा असल्याचं मत व्यक्त केलं आहे. देशात सध्या कोरोनामुळे विविध ठिकाणी आरोग्य यंत्रणांवर ताण येत असताना पाहायला मिळत आहे. त्यातच देशभरातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतेच महाराष्ट्रात विकेंड लॉकडाऊन घोषित केले आहे.
“कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर देशात समूह संसर्ग म्हणजेच ‘कम्युनिटी ट्रान्समिशन’ होण्याची दाट शक्यता असल्याने वेळीच जर नियंत्रण मिळवलं नाही, तर आरोग्य व्यवस्थेवर येणारा ताण हा असाच कायम राहील आणि काही दिवसांनी आरोग्य व्यवस्था अपुरी पडेल. त्यामुळे देशात एक मायक्रो लॉकडाऊन आवश्यक आहे” असा सल्ला रणदीप गुलेरिया यांनी दिला आहे.