दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता पुढे ढकला……..!
मुंबई दि.६ – राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव अजूनही सुरुच आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कडक निर्बंध लावले आहेत, याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विविध क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधला, यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशीही त्यांनी संवाद साधला. त्यानंतर आता राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकारला कानपिचक्या दिल्या आहेत तसेच काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. यामध्ये त्यांनी दहावी-बारावीच्या परीक्षांसंदर्भात देखील एक महत्त्वाची मागणी केली आहे.
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविना पुढच्या वर्गात टाका, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली, यावेळी त्यांनी ही मागणी केली. याआधी सरकारने पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता पुढच्या वर्गात टाकण्याचा निर्णय घेतला आहे.राज्यात कोरोनाची स्थिती गंभीर आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळणं कितपत योग्य आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यामुळे आता ठाकरे सरकार राज ठाकरे यांची ही मागणी विचारात घेऊन दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा देणार का?, असा प्रश्न आहे.