#Lockdown
केज शहरात बाजारपेठ कडकडीत बंद, मात्र रहदारी सुरू…….!
केज दि.१० – कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे संपूर्ण राज्यात वीकेंडलॉक डाउन चा पर्याय निवडलेला आहे. कोरोनाची साखळी तोडण्याच्या आवाहनाला केज शहरात व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. मात्र कांही नागरिक रस्त्याने फिरताना दिसून येत असल्याने पोलिसांना त्यांच्यावर करडी नजर ठेवावी लागत आहे.
शुक्रवारी रात्री आठ वाजल्यापासून वीकेंड लॉकडाउन ला सुरुवात झाली आहे. सदरील लॉकडाउन ला सर्वांनी प्रतिसाद देण्याचे आवाहन केज पोलीस, तहसील प्रशासन यांच्या वतीने करण्यात आले होते. त्यानुसार बाजारपेठ कडकडीत बंद असून चौकाचौकात पोलिसांचा बंदोबस्त आहे. मात्र गांभीर्य नसलेले लोक अधूनमधून रस्त्यावर फिरताना दिसून येत आहेत. तर वाहतुकीला कांही अंशी सूट असल्याने वाहनांची वर्दळ दिसून येत आहे. तर तुरळक प्रमाणात एसटी महामंडळाची सेवा सुरू असली तरी प्रवाश्याविना बसेस धावत आहेत.
तर अत्यावश्यक सेवा सुरू असल्याने दवाखाने व मेडिकल दुकानांवर ग्राहकांची ये जा दिसून येत आहे. तसेच शहरातील बहुतांश भागात बोअरवेल चे पाणी गेल्याने पाण्याचे टँकर बोलावल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे वॉटर जारची वाहने तसेच टँकर पाणी पुरवठा करताना दिसून येत आहेत. मात्र केज पोलिसांच्या वतीने लॉकडाउन पाळण्याचे आवाहन केल्या जात असल्याने पोलिसांची गाडी दिसली की विनाकारण फिरणारे लोक तोंड लपवत आहेत.