#Corona
केज शहरात दोन्ही सेंटर वर सुमारे अडीचशे कोरोना रुग्णांवर उपचार सुरू…….!
केज दि.१७ – कोरोनाच्या पहिल्या लाटेत केज तालुका प्रशासनाने रुग्ण संख्या आटोक्यात ठेवली होती. मात्र दुसऱ्या लाटेत संपूर्ण महाराष्ट्रात हाहाकार माजल्याने तालुकाही त्याला अपवाद राहिला नसून तालुक्यात दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत आहे. मागच्या दोन वेळेस तर शंभरी पार केल्याने सीसीसी वर भार पडत असून शहरात अन्य एका ठिकाणी रुग्णांची व्यवस्था करण्यात आली आहे.
केज शहराच्या बाजूला असलेल्या पिसेगाव येथे समाजकल्याण विभागाच्या पहिल्या लाटेत सीसीसी कार्यान्वित करण्यात आले.सदरील सेंटरची क्षमता १०० रुग्णांची होती. मात्र तेंव्हा ती पुरेशीही होती. आणि रुग्ण संख्या कमी झाल्याने ते सेंटर कांही काळ बंदही करण्यात आले होते. मात्र जसा दुसऱ्या लाटेचा प्रकोप सुरू झाला तसे सेन्टरही पुन्हा सुरू करावे लागले. दिवसेंदिवस रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर क्षमता वाढवून दीडशे केली. मात्र सध्या पिसेगाव सेंटर मध्ये दि.१६ पर्यंत १७० रुग्ण उपचार घेत आहेत.
वाढीव रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर तालुका प्रशासनाने पर्यायी व्यवस्था कार्यान्वित केली असून शहरातील बीड रोड वरील शारदा इंग्लिश स्कूल ची इमारत ताब्यात घेऊन रुग्णानांवर तिथेही उपचार केले जात आहेत.सध्या तिथे आजपर्यंत ५८ रुग्ण भरती असल्याची नोंद आहे, तर क्षमता २०० रुग्णांची असून ३०० पर्यंत वाढण्याची तयारी आहे. पिसेगाव येथे चार तर शारदा इंग्लिश स्कूल मध्ये दोन ऑक्सिजन बेडची व्यवस्था आहे. सदरील रुग्णांवर उपचार करण्यासाठी दोन्हीकडे मिळून सुमारे ६० आरोग्य कर्मचारी आहेत.
उपचार दरम्यान रुग्णांचे दिवसातून तीन वेळेस ऑक्सिजन लेवल तपासली जात असल्याचे सांगण्यात आले. तर कांही गंभीर लक्षणे दिसून येताच संबंधित रुग्णांना लोखंडी सावरगाव येथे रेफर करण्यात येत आहे. सीसीसी मध्ये मिळणाऱ्या जेवणाचा दर्जा अगदीच घरच्यासारखा नसला तरी बऱ्यापैकी चहा, नाष्ठा दिल्या जात आहे. स्वच्छतेच्या बाबतीत अनेकदा रुग्णांची ओरड असते मात्र कर्मचारी वर्ग अपुरा असल्याने कधी कधी ही समस्या निर्माण होत आहे. तर पिसेगाव आणि शारदा इंग्लिश स्कूल मध्ये भरती असलेल्या रुग्णांना देण्यात येणारे जेवण एकाच संस्थेकडे असल्याने दोन्हीकडे जेवण देणे एकाच वेळेस शक्य होत नसल्याने रूग्णांना जेवणाची वाट पहावी लागत आहे. तर शारदा इंग्लिश स्कूल मध्ये उभारण्यात आलेल्या रुग्णांना कॉट ची कमतरता असून जमिनीवर गादया टाकून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान दिवसेंदिवस रुग्ण वाढीचा आलेख पाहता केज शहरात ५०० रुग्णांची सोय व्हावी यासाठी प्रशासन सज्ज असून इतर कांही इमारती बघून ठेवल्या असल्याची व सध्या तरी औषधी पुरेश्या प्रमाणात उपलब्ध असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास आठवले यांनी दिली.
वाढत्या रुग्ण संख्येचा विचार करता आता तरी जनतेने शहाणे होण्याची गरज असून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने दिलेल्या नियमाचे आणि लॉकडाउन चे तंतोतंत पालन करून प्रशासनास सहकार्य करावे. तसेच मृत्यू दर कमी करण्यासाठी लवकर टेस्ट, लवकर निदान, लवकर उपचार करण्यासाठी जनतेने स्वतःहून पुढे येऊन टेस्टिंग करून घेण्यात याव्यात असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विकास आठवले यांनी केले आहे.