#Corona

लोकहो आतातरी जागे व्हा……! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता महिलेने पतीला तोंडाने ऑक्सिजन देण्याचा प्रयत्न केला मात्र जीव वाचू शकला नाही…….!

लखनऊ दि.२४ – संपूर्ण देश सध्या कोरोना महामारीच्या या भयानक संकटाला तोंड देत आहे. देशात दररोज लाखा पेक्षाही जास्त नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. अशा परिस्थितीत रुग्णांसाठी बेड, ऑक्सिजन बेड मिळणं कठीण होऊन बसलं आहे. महाराष्ट्र पाठोपाठ उत्तर प्रदेश, राजधानी दिल्लीतही भयावह परिस्थिती आहे. रुग्णालयांबाहेर अनेक रुग्ण ताटकळत उपचारासाठी वाट बघत आहेत. पण त्यांच्यापर्यंत डॉक्टर वेळेवर पोहोचू शकत नाहीयत. वेळेवर उपचार न मिळाल्याने रुग्ण दगावत आहेत. तर काही ठिकाणी ऑक्सिजन बेड न मिळाल्याने रुग्णांचा मृत्यू होतोय. उत्तर प्रदेशच्या आगरा जिल्ह्यात अशीच एक घटना समोर आली आहे, ज्या घटनेमुळे संपूर्ण देश हळहळ व्यक्त करत आहे. त्यामुळे लोकहो आतातरी जागे व्हा अशी म्हणण्याची वेळ आली आहे, मात्र याचे गांभीर्य दिसून येत नाही.

आगऱ्यात ऑक्सिजन बेड वेळेवर न मिळाल्याने 47 वर्षीय रवी सिंघल यांचं निधन झालं आहे. त्यांच्या पत्नी रेनू सिंघल यांनी त्यांना वाचवण्याचा प्रचंड प्रयत्न केला. रेनू आपल्या पतीला रिक्षातून दोन-तीन रुग्णालयांमध्ये दाखल करण्यासाठी घेऊन गेल्या. मात्र, ऑक्सिजन बेड उपलब्ध नसल्याने रुग्णालय प्रशासनाने दाखल करुन घेण्यास नकार दिला. त्यामुळे रेनू आपल्या पतीला रिक्षाने दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जात होत्या. पण यादरम्यान त्यांचे पती रवी यांनी जीव सोडला. रेनू यांनी पतीला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. रवी यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने पत्नी रेनूने तोंडाने ऑक्सिजन देण्याचा प्रयत्न केला. पण सगळे प्रयत्न व्यर्थ ठरले.

दरम्यान तीन ठिकाणी ऑक्सिजन बेड उपलब्ध न झाल्याने रेनू आपल्या पतीला घेऊन एसएन मेडिकल कॉलेज येथे पोहोचल्या. पण तिथल्या डॉक्टरांनी तपासल्यानंतर रवी यांनी मृत घोषित केलं. रेनू यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. त्यांना सुरुवातीला विश्वास बसत नव्हता. रेनू यांनी रुग्णालयातच टाहो फोडला. विशेष म्हणजे रवी यांच्यासारखे अनेक रुग्णांना ऑक्सिजन बेडसाठी वणवण फिरावं लागत आहे. महामारीच्या या भयानक दृश्याने आख्खा देश हादरला आहे.ही घटना जरी उत्तरप्रदेश मधील असली तरी यापेक्षा भयाण अवस्था महाराष्ट्रात शहरी भागासह ग्रामीण भागात दिसून येत आहे. कालच लातूर येथेही अशीच घटना घडली असून रुग्णालयाच्या दारात पतीचा जीव गेल्याने त्या महिलेचा आकांत जीवघेणा होता.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close