राज्यातील ‘या’ भागात येत्या 48 तासात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता……!
मुंबई दि.२७ – महाराष्ट्रासह देशभरात उष्णतेने वाढली होती. मात्र वाढत्या उष्णतेदरम्यान अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. राज्यात येत्या 48 तासात मध्य , कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र या भागात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यासोबतच अनेक ठिकाणी वादळी-वाराही राहण्याची शक्तता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
वाढलेल्या उष्म्यामुळे वातावरणात अनपेक्षित बदल झाला. या पावसाने नागरिकांना उकाड्यापासून दिलासा दिला असला तरी शेतपीकाच्या नुकसानीची धास्ती वाढली आहे. देशात इतर काही राज्यांतही अशीच परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे. बळीराजाला या अवकाळी फटका बसण्याची शक्यता आहे. यामध्ये उन्हाळी कडधान्य, बाजरी, भूईमुग आणि भाजीपाल्याचं नुकसान होण्याची शक्यता आहे. राज्यभरासह देशातही वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
दरम्यान, उत्तराखंड, आसाम, मेघालय, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि गोवा, तेलंगणा, केरळ तसेच माहे आणि जम्मू, काश्मीर, लडाख, गिलगिट-बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगालमधील मैदानी क्षेत्र, ओडिशा, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरा, किनारी आंध्र प्रदेश आणि यानम, रायलसीमा, दक्षिणेकडील आंतरिक कर्नाटक आणि तामिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकलमध्ये वाऱ्यासह वादळ येण्याचा अंदाज आहे.