क्राइम
नापिकीला कंटाळून केज तालुक्यात शेतकऱ्याची आत्महत्या, तर अन्य एका घटनेत महिलेचा विनयभंग……..!
डी डी बनसोडे
May 4, 2021
केज दि.४ – नापिकीमुळे शेतीसाठी घेतलेले कर्ज फेडायचे कसे ? या विवंचनेतून एका ५० वर्षीय शेतकऱ्याने राहत्या घरातील आडूला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना केज तालुक्यातील मुंडेवाडी येथे घडली.
मुंडेवाडी येथील शेतकरी भास्कर शंकर मुंडे ( वय ५० ) यांनी शेतीसाठी कर्ज घेऊन पेरणी करीत होते. मात्र शेतात पीकपाणी न पिकल्याने हातात काहीच उत्पन्न पडले नाही. त्यात कुटुंबांचा उदरनिर्वाह चालवायचा प्रश्न पडला होता. आता शेतीसाठी घेतलेले कर्ज फेडायचे कसे ? या विचाराने चिंताग्रस्त बनले होते. शेवटी टोकाची भूमिका घेत भास्कर मुंडे यांनी ३ एप्रिल रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घरी कोणी नसताना राहत्या घरातील पत्र्याच्या आडूला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच जमादार मुकुंद ढाकणे, पोलीस नाईक सानप यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. शेषाबाई भास्कर मुंडे यांच्या खबरेवरून केज पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस नाईक सानप हे पुढील तपास करत आहेत.
महिलेचा विनयभंग करून मंगळसूत्र काढून घेतले
केज दि.४ – शेत नांगरणी करण्यास विरोध करून एका २६ वर्षीय महिलेचा विनयभंग करून आरोपीतांनी १५ हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र तोडून घेतले. पीडितेच्या पतीला ही मारहाण करून खिशातील १२ हजार रुपये काढून घेतल्याची घटना केज ठाण्याच्या हद्दीत घडली असून याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
पीडित महिला ही २७ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास तिच्या पतीचा शेतीचा वाद न्यायालयात सुरू असलेल्या जमिनीत नांगरणी करून घेत होती. हे पाहून मस्साजोग येथील आरोपी भगवान मेसु सोनवणे, अशोक भगवान सोनवणे, अमरदीप भगवान सोनवणे व इतर तीन अनोळखीने शेतीशी तुमचा काहीही संबंध नसून शेत नांगरू नका असे म्हणत नांगरणी करणाऱ्यांना लाथाबुक्याने मारहाण केली. तर अशोक सोनवणे याने पीडितेच्या पतीच्या खिशातील १२ हजार रुपये काढून घेतले. पीडितेच्या हाताला वाईट हेतूने धरून ओढत विनयभंग करून १५ हजार रुपये किंमतीचे मंगळसुत्र काढून घेतले. जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. अशी फिर्याद पीडित महिलेने दिल्यावरून भगवान सोनवणे, अशोक सोनवणे, अमरदीप सोनवणे यांच्यासह इतर अनोळखी तिघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन हे पुढील तपास करीत आहेत.