लातूरमध्ये पार पडला अनोखा विवाह सोहळा……!
लातूूर दि.५ – लग्न म्हटलं की डोळ्यासमोर येत ते लग्नमंडप, फोटोग्राफर आणि खूप सारी लोकं. मात्र कोरोनामुळे सरकारने आता लग्न करताना काही नियम दिले आहेत ते पाळावे लागतात अन्यथा दंड भरावा लागतो. मात्र अशा सगळ्यात लातूरमध्ये एक आगळावेगळा विवाहसोहळा पार पडला आहे. महत्त्वाचं म्हणजे या लग्नाला वऱ्हाडी मंडळी दोनशेपेक्षा जास्त होते आणि हेच या लग्नाचं विशेष होतं.
या लग्नाला जे वऱ्हाडी आले होते ती काही माणसं नव्हती तर गोशाळेतील 200 पेक्षा जास्त गाई होत्या. त्यामुळे हा अनोखा सोहळा आता जिल्ह्यात चर्चेचा विषय झाला आहे. कोणत्याही हॉलमध्ये किंवा लॉन्समध्ये नाहीतर गोशाळेत हा विवाहसोहळा पार पडला. लातूर शहरातील माहेश्वरी समाजातील डॉक्टर भाग्यश्री गोपाळ झंवर आणि जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील कुंभारी पिंपळगाव येथील डॉक्टर सचिन सत्यनारायण चांडक यांचा विवाह श्री गुरु गणेश जैन गोशाळेत आज पार पडला.हा विवाह खरं तर सहा महिन्यांपुर्वी ठरला होता मात्र कोरोनामुळे या अनेक अडचणी येऊ लागल्या होत्या. मात्र त्यानंतर अशा प्रकारे विवाह सोहळा करण्यासाठी परिवारातील पाहुण्यांचे एकमत झालं. अतिशय कमी वेळेत आणि कमी लोकांत लग्न पार पडलं.
दरम्यान, कोराना काळात अशा प्रकारे विवाह सोहळा करून त्यांनी सर्व नियमांचे पालन करत कमी वेळात लग्न विधी संपन्न केले. मात्र या विवाह सोहळ्याची जोरात चर्चा चालू आहे.