क्राइम
केज तालुक्यात दोन गटात हाणामारी ; दहा जणांविरुद्ध परस्परविरोधी गुन्हे
डी डी बनसोडे
May 5, 2021
केज दि.५ – तालुक्यातील एकुरका येथे सख्या दोन भावात काठ्या, कुऱ्हाडीने हाणामारी झाली. या हाणामारीत दोघांचे डोके फुटले असून एकाच्या हाताचे बोट फॅक्चर झाले आहे. याप्रकरणी दहा जणांविरुद्ध केज पोलिसात परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.
एकुरका येथील शेतकरी गुणवंत जनार्धन केदार ( वय ४२ ) यांना ४ मे रोजी गावातील पुलाजवळ अडवून तू आमच्या विरोधात पोलिसात केस करायला श्रीकिसन शेषेराव केदार यास का पाठविले ? अशी कुरापत काढून शिवीगाळ करीत त्यांचा भाऊ हनुमंत जनार्धन केदार व महादेव रावसाहेब चौरे या दोघांनी धरून गुणवंत केदार यांना चापटाबुक्याने मारहाण केली. तर त्यांचा पुतण्या राजकुमार हनुमंत केदार याने हातातील कुऱ्हाड गुणवंत यांच्या डोक्यात मारून डोके फोडले. तर राजकुमार हनुमंत केदार व अमोल महादेव चौरे या दोघांनी गुणवंत यांच्या मुलांना धरून ठेवले. तसेच शांताबाई हनुमंत केदार यांनी त्यांना दगडाने मारहाण करून दुखापत केली. शिवाय मुक्कामार देऊन त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या ही दिल्या.
दुसऱ्या गटाचे राजकुमार हनुमंत केदार ( वय २० ) या तरुणाने ४ एप्रिल रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास गावातील पुलावर चुलते गुणवंत जनार्धन केदार यांनी आईकडून ४० हजार रुपायामध्ये खरेदी केलेली एक एकर जमीन परत मागीतली असता गुणवंत केदार, गजानन केदार यांनी राजकुमार केदार यास काठीने हातावर, पाठीवर मारहाण केली. या मारहाणीत हाताचे बोट फॅक्चर झाले. त्याचे वडील हनुमंत केदार हे भांडण सोडवण्यास आले असता त्यांच्या डोक्यात काठीने मारून डोके फोडले. त्याची आई शांताबाई यांना शितल केदार यांनी लाथाबुक्क्याने मारहाण केली आहे. तर अशोक केदार याने शिवीगाळ करीत जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या.
दरम्यान, गुणवंत केदार यांच्या फिर्यादीवरून हनुमंत केदार, राजकुमार केदार, सिद्धेश्वर केदार, अमोल चौरे, महादेव चौरे, शांताबाई केदार या सहा जणांविरुद्ध तर राजकुमार केदार याच्या फिर्यादीवरून गुणवंत केदार, गजानन केदार, अशोक केदार, शीतल केदार या चौघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. जमादार मुकुंद ढाकणे हे पुढील तपास करत आहेत.