#Social
मराठा आरक्षणाच्या लढ्यात युवक काँग्रेस कायम सोबत असेल – आदित्य पाटील
केज दि.१० – मराठा आरक्षण मिळावे ही भूमिका काँग्रेस पक्षाची व नेतृत्वाची कायम आहे. यासाठी काँग्रेसचे वरिष्ठ नेते यामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आदी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी याबाबत पक्षाची भूमिका जाहीर केलेली आहे. तीच भूमिका कायम असून काहीजण मात्र पक्ष भूमिका बाजूला ठेवून विनाकारण समाजाच्या भावना भडकावत आहेत.मात्र अशा भूमिकेचे काँग्रेस पक्ष म्हणून कधीही समर्थन होणार नाही असे मत युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा केजचे माजी नगराध्यक्ष आदित्य पाटील यांनी व्यक्त केले.
काँग्रेस पक्ष हा समाजातील सर्व जाती धर्माना धरून चालणारा पक्ष आहे. १८ पगड जाती धर्मातील लोकांनी या पक्षात विविध पदांवर आजपर्यंत काम केल्याच्या इतिहास असून हा पक्ष कोण्या एका जातीधर्माच्या नसून सर्वधर्मसमभाव हे ब्रीद घेऊन चालणारा पक्ष आहे. पक्षाने मराठा आरक्षणाच्या संदर्भात आपली भूमिका स्पष्टपणे बोलून व कृतीतून दाखवलेली आहे. कॉँग्रेसचे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी ते मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा केलेला होता. परंतु नंतर राज्यात सत्तांतर झाले व पुढील सरकारने त्या निर्णयाची पूर्तता न केल्याने पुन्हा समाजाला मराठा आरक्षणाचा लढा लढावा लागत आहे. मात्र मराठा समाजाला आरक्षण हे मिळालेच पाहिजे ही भूमिका राज्य सरकारने घेतली आहे व त्यादृष्टीने सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचे आदित्य पाटील यांनी म्हटले आहे.
पक्षात अनेक छोटे मोठे कार्यकर्ते असतात मात्र प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून व्यक्तव्य करायला हवे. परंतु अनेक वेळा काहीजण कोणाला तरी खुश करण्यासाठी विनाकारण काहीही बोलतात त्यामुळे समाजात तेढ निर्माण होण्याचे प्रसंग उभे राहतात. याकडे कोणीही लक्ष देऊ नये त्याबाबत पक्ष नेतृत्व काय निर्णय घायचा ते घेतील. परंतु पक्षाची भूमिका ही कायम आहे याबद्दल कोणीही जिल्ह्यात या मुद्यावर राजकारण करण्याचा प्रयत्न करू नये. जिल्ह्यात सोशल मीडियावर काहींनी टाकलेल्या पोस्टमुळे अनेकांनी आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आम्हालाही अनेकांनी फोन करून आपला राग व्यक्त केला आहे. परंतु यावर निर्णय पक्षश्रेष्ठींनी घ्यावयाचा असतो. बीड जिल्हा युवक काँग्रेस मराठा आरक्षण लढ्यात कायम मराठा समाजसोबतच असेल यात शंका नाही असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.