भोंदूबाबाकडून महिलेची फसवणूक; पोलिसात गुन्हा दाखल……!
_________
केज दि. १३ – तुमच्या घरातील करणी-भानामती व गुप्तधन काढून देतो! असे म्हणून एका पस्तीस वर्षीय महिलेची सहा लाख रूपये अर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी फसवणूक झालेल्या महिलेने पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून बुधवार (दि.१२) रोजी धारूर पोलीस ठाण्यात भोंदुबाबा विरोधात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिलेच्या तक्रारीने अनेक दिवसांपासून भोंदूगीरी करणाऱ्या भोंदूबाबाचे दुष्कृत्य समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
तालुक्यातील आडस येथील वैजेनाथ बळीराम मेहत्रे (वय-६२) हा मागील पंचेवीस-तीस वर्षांपासून जनतेच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन करणी-भानामतीच्या नावाखाली सामान्यांची अर्थिक लूट करत महाराष्ट्र जादूटोणा प्रतिबंधात्मक कायद्याचे राजरोसपणे उल्लंघन करत आहे. अशीच अर्थिक फसवणूक झालेल्या स्वाती दत्ता खाडे या महिलेने संबंधित भोंदूबाबाच्या विरोधात बुधवारी तक्रार दाखल केली आहे. मी व माझे पती शेती करून तीन मुली असे अपत्ये असलेल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह चालवत आहोत. वर्षभरापूर्वी वैजेनाथ मेहत्रे (महाराज) आमच्या घरी आले. त्यावेळी त्यांनी तुमच्या घरात गुप्तधन आहे ते मी काढून देतो. मात्र त्यापुर्वी तुमच्यावर केलेले केलेले करणी-भानामती काढावी लागते ती मी काढतो असे सांगितले. पतीला विश्वासात त्यांच्याकडून सव्वीस जानेवारी रोजी पन्नास हजार रुपये घेतले. त्यानंतर दोन फेब्रुवारी रोजी गणेश कोराळे (रा. मानेवाडी) यांच्या समक्ष एक लाख, पंचेवीस फेब्रुवारी रोजी संतोष मेहत्रे यांच्या समक्ष दोन लाख रूपये दिले. त्यानंतर चौदा मार्च रोजी वैजेनाथ मेहत्रे यांनी आमच्या घरी येऊन म्हणाले, आपले ठरलेले पैसे दिल्याशिवाय मी गुप्तधन काढून देणार नाही. त्यावेळी आम्ही पती-पत्नी म्हणालो, तुम्हाला आतापर्यंत साडेतीन लाख रूपये दिले आहेत. त्यावर ते म्हणाले, अगोदर राहिलेले पैसे द्या. त्यामुळे आम्ही महालिंग प्रभूआप्पा आकुसकर यांच्या समक्ष अडीच लाख दिले. ठरल्याप्रमाणे एकूण सहा लाख रूपये दिले. त्यानंतर आतातरी आमच्या राहत्या घरातील गुप्तधन काढुन करणी-भानामती दुरूस्ती करण्याची विनंती केली. त्यावर ते म्हणाले तुमच्यावर खूप मोठे संकट आहे, ते अगोदर दूर करू असे सांगू टाळाटाळ करत सहा लाख रूपायाची फसवणूक केली असल्याचे पोलिसात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.
याप्रकरणी फसवणूक झालेल्या महिलेने दिलेल्या तक्रारीवरून बुधवारी वैजेनाथ मेहत्रे याच्या विरोधात धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक अडागळे हे करत आहेत.