अनेक राज्यातून हजारो शेतकरी पोहोंचतात घट मांडणी ऐकण्यासाठी बुलढाण्यात……!
बुलढाणा दि.१५ – सर्वत्र प्रसिद्ध असणाऱ्या भेंडवळच्या घट मांडणीचे निष्कर्ष जाहीर झाले आहेत. भेंडवळच्या भाकिताकडं राज्यभरातील शेतकऱ्यांचं लक्ष लागून असतं. भेंडवळच्या या घट मांडणीच्या निष्कर्षाला 350 वर्षांची परंपरा आहे. राज्यात कोरोनाचा कहर वाढला आहे. त्यामुळं याहीवर्षी बुलडाण्यातील ही प्रसिद्ध भेंडवळची घट मांडणी शासनाच्या निर्बंधामुळे पारिवारिक पूजा करुन घरातूनच करण्यात येणार असल्याची माहिती सारंगधर महाराज वाघ यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. त्यानुसार आता या घट मांडणीतून सांगण्यात आलेले निष्कर्ष पुढे आले आहेत.
भेंडवळच्या घट मांडणीच्या भाकितानुसार यावर्षी पाऊस जून महिन्यात कमी तर जुलै महिन्यात चांगल्या प्रमाणात होणार आहे. ऑगस्ट महिन्यात साधारण तर सप्टेंबर महिन्यात पाऊस कमी आहे. विशेष म्हणजे अवकाळी पावसातून यंदा दिलासा मिळेल. तर, चिंता देखील व्यक्त करण्यात आली आहे की, पृथ्वीवर मोठं संकट येईल तर संपूर्ण जगात आर्थिक टंचाई भासेल. देशाच्या राजाची गादी कायम राहणार आहे. मात्र, राजाला अनेक अडचणींचा, तणावाचा सामना करावा लागेल. देशाच्या प्रधानावर हे संकट आहे तर, देशाच्या सरंक्षण खात्यावर दबाव आणि ताण राहणार असून घुसखोरीचा प्रभाव जास्त राहील, असं भाकित व्यक्त करण्यात आलं आहे.
घट मांडणी ऐकण्यासाठी दरवर्षी गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक, मराठवाडा, खान्देश या ठिकाणाहून शेतकरी येतात. अक्षय्य तृतीये दिवशी हे भाकित सांगितलं जातं. 350 वर्षांपूर्वी महान तपस्वी चंद्रभान महाराज वाघ यांनी ही परंपरा सुरू केली होती, जी त्यांचे वंशज आजही पुढे चालवत आहेत. सारंगधर महाराज वाघ यांनी हे भाकित व्यक्त केलं आहे.
दरम्यान, यावर्षीही रोगराई जास्त प्रमाणात असणार आहे. कोरोना महामारीतून यावर्षात तरी दिलासा नाही. तर शेतकऱ्यांसाठी संंमिश्र भाकित या घट मांडणीत करण्यात आलं आहे.