क्राइम
महावितरणला अंधारात ठेवून लाईनमनने शेतकऱ्यांकडून पैसे घेऊन शेती पंपासाठी वीज जोडली…….!
डी डी बनसोडे
May 20, 2021
(प्रतिकात्मक फोटो
केज दि.२० – विद्युत महावितरण कार्यालयाची परवानगी न घेता लाईनमनने ११ शेतकऱ्यांशी संगनमत करीत त्यांच्याकडून १ लाख २० हजार रुपयांची रक्कम घेऊन वेगवेगळ्या तीन रोहित्रवर तार टाकून शेती पंपासाठी वीज जोडणी दिल्याचा प्रकार केज तालुक्यातील दहिफळ ( वडमाऊली ) व लिंबाचीवाडी येथे उघडकीस आला. या प्रकरणी लाईनमनसह ११ शेतकऱ्यांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
बीड शहरातील शहेंशहा नगर भागातील वहिद्दीन सईद्दीन सय्यद हे विद्युत महावितरण कंपनीच्या केज येथील कार्यालयात लाईनमन ( प्रधान तंत्रज्ञ ) या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी शेतकरी रामहरी प्रल्हाद सुरवसे ( रा. दहिफळ वडमाऊली ), बाबासाहेब रावसाहेब माने, मुकिंदा भास्कर माने, विक्रम नामदेव काकड, महारुद्र भानुदास काकड, नानभाऊ नामदेव माने, कामराव तात्या माने, श्रीकांत विष्णू माने, नितीन रामराव माने, बाळू सखाराम माने, अभिमान विश्वनाथ हराळ ( सर्व रा. लिंबाचीवाडी ) यांच्याशी संगनमत करून विद्युत महावितरण कंपनीच्या कार्यालयाची परवानगी न घेता २० डिसेंबर २०२० ते २२ एप्रिल २०२१ या दरम्यानच्या काळात दहिफळ ( वडमाऊली ) व लिंबाचीवाडी शिवारात वेगवेगळे तीन रोहित्रवर विनापरवाना बेकायदेशीररीत्या तारेची जोडणी करून वरील ११ शेतकऱ्यांकडून १ लाख २० रुपये घेऊन शेती पंपासाठी वीज जोडणी दिली. हा प्रकार विद्युत महावितरण कंपनीच्या पथकाच्या निदर्शनास आला. त्यानंतर नांदूरघाट येथील ३३ के. व्ही. विद्युत उपकेंद्राचे कनिष्ठ अभियंता तथा पथक प्रमुख साईराज अशोक नागवेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी लाईनमन वहिद्दीन सय्यद, शेतकरी रामहरी सुरवसे, बाबासाहेब माने, मुकिंदा माने, विक्रम काकड, महारुद्र काकड, नानभाऊ माने, कामराव माने, श्रीकांत माने, नितीन माने, बाळू माने, अभिमान हराळ या १२ जणांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमादार मुकुंद ढाकणे हे पुढील तपास करत आहेत.
पाईपलाईन फोडल्याच्या कारणावरून तरुणावर कोयत्याने हल्ला……!
केज दि.२० – सामायिक पाईपलाईन मधून चुलत भाऊ पाणी घेऊ देत नसल्याच्या रागातून पाईपलाईन फोडली म्हणून तिघाने संगनमताने तरुणास कोयत्याने मारहाण केल्याचा घटना कोरेगाव (ता.केज) येथे घडली आहे. या प्रकरणी केज पोलिसांत तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील कोरेगाव येथे धनराज युवराज तांदळे व त्याचा चुलत भाऊ अविनाश बाबासाहेब तांदळे यांचे शेजारी शेजारी शेत असून एक विहीर व पाईपलाईन सामायिक आहे. मात्र मागच्या सहा महिन्यांपासून अविनाश हा धनराज याच्या शेतीसाठी पाणी घेऊ देत नसल्याने धनराज याने सदरील पाईपलाईन रागाच्या भरात फोडून टाकली. आणि याचाच राग मनात धरून दि.१९ रोजी धनराज हा त्याच्या घरासमोर रात्री ९.३० वाजता झोपलेला असताना अशोक विठ्ठल नेहरकर, अविनाश बाबासाहेब तांदळे व बप्पा शामराव तोंडे हे तिघे तिथे आले व तू पाईपलाईन का फोडलीस असे म्हणत अशोक याने कोयत्याने वार करून जखमी केले. तर अविनाश व बप्पा यांनी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. यामध्ये धनराज याच्या डाव्या कानाला व हाताला जखम झाली आहे.
दरम्यान धनराज युवराज तांदळे याच्या फिर्यादीवरून वरील तिघांविरोधात केज पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास फौजदार श्रीराम काळे हे करत आहेत.