क्राइम

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या……!

पाटोदा दि.27 – कार घेण्यासाठी माहेरून अडीच लाख रुपये घेऊन येण्यासाठी सासरच्यांनी विवाहितेचा अतोनात छळ केला. सततच्या छळाला त्रासलेल्या विवाहितेने सॅनिटायजर प्राशन करून आत्महत्या केली. मात्र, विवाहितेने विषारी द्रव प्राशन केल्याचे उघड होऊ नये यासाठी शवविच्छेदन टाळण्यासाठी सासरच्यांनी चक्क तिचा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा बोगस रिपोर्ट बनवला. परंतु, माहेरच्या लोकांच्या सतर्कतेमुळे त्यांचा प्रयत्न फसला आणि शवविच्छेदन पार पडले. याप्रकरणी पतीसह सासरच्या चौघांवर पाटोदा पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.
पूजा गणेश रायकर (वय २१, रा. धनगर जवळका ता. पाटोदा) असे त्या मृत विवाहितेचे नाव आहे. पूजाचे माहेर अंबाजोगाईचे आहे. तिचे वडील बिभीषण महादेव शेवाळे यांच्या फिर्यादीनुसार पूजाचा विवाह दोन वर्षापूर्वी गणेश शिवाजी रायकर याच्यासोबत झाला होता. गणेश पुण्यात एका खाजगी वाहतूक कंपनीत कामाला आहे. लग्नानंतर सुरुवातीचे दिड वर्ष चांगले गेले. त्यानंतर तुला अजूनही मुलबाळ होत नाही असे पती गणेश, सासरा शिवाजी अर्जुन रायकर आणि सासू विजुबाई हे सतत तिला म्हणू लागले. कार घेण्यासाठी माहेरहून अडीच लाख रुपये घेऊन ये असा तगादा तिच्यामागे लावला. सहा महिन्यापूर्वी पूजाच्या आई-वडिलांनी आर्थिक परिस्थिती बिकट असून आणखी एका मुलीचे लग्न करायचे बाकी आहे, पैसे आल्यास आम्ही तुम्हाला गाडीसाठी पैसे देऊ असे पूजाच्या सासरच्यांना सांगितले. 

                 एप्रिल महिन्यात लॉकडाऊनमुळे गणेश पूजासह गावी धनगरजवळका  येथे परतला. तिथे आल्यावर त्याने आई-वडिलांच्या मदतीने कारच्या पैशासाठी पूजाचा सतत मारहाण, शिवीगाळ करून छळ सुरु केला, तिला उपाशी ठेवू लागले. सततचा छळ असह्य झाल्याने पूजाने बुधवारी (१९ मे) दुपारी तीन वाजता वडिलांना शेवटचा कॉल केला आणि त्यानंतर तिने सॅनिटायजर प्राशन केले. तिला अत्यवस्थ अवस्थेत अहमदनगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर मंगळवारी (२५ मे) रात्री आठ वाजता गणेशचा मावस भाऊ नामदेव हरिभाऊ सुडके हा रुग्णवाहिका घेऊन तिथे आला. पुण्यात माझी लॅब असल्याने खाजगी रुग्णालयात माझे संबंध आहेत, उपचार चांगले होतील असे म्हणत त्याने पुजाला नेऊन पुण्यातील रुग्णालयात दाखल केले. तिथे बुधवारी (२६ मे) पहाटे ४ वाजता पूजाचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला.

                     परंतु पूजाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यास विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचे उघड होईल हे चाणाक्ष नामदेवच्या लक्षात आले. नियमानुसार कोरोना रुग्णांचे शवविच्छेदन करत नाहीत. त्यामुळे शवविच्छेदन टाळण्यासाठी नामदेवने स्वतःच्या लॅबमध्ये पुजाची कोरोना चाचणी केली आणि ती पॉझिटिव्ह असल्याचा खोटा लेखी अहवाल रुग्णालयाला सादर केला. परंतु, पूजाच्या माहेरच्या लोकांना हा अहवाल मान्य नसल्याने त्यांनी दुसरीकडे पुजाची कोरोना चाचणी केली असता ती निगेटिव्ह आली. त्यानंतर पूजाचा मृतदेह नातेवाईकांना मिळाला आणि तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.  

                 दरम्यान पूजाच्या वडिलांच्या फिर्यादीवरून तिचा पती गणेश, सासरा शिवाजी, सासू विजुबाई आणि मावस भाऊ नामदेव सुकडे याच्यावर पाटोदा पोलीस ठाण्यात हुंड्यासाठी छळ आणि आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी पती आणि सासऱ्यास ताब्यात घेतले आहे. त्या दोघांना गुरुवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तर, सासू आणि कोरोना चाचणीचा बोगस अहवाल आणून देणारा मावस भाऊ फरार आहेत. पुढील तपास पीएसआय पठाण करत आहेत.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close