#Accident
कारची दोघांना धडक ; दुचाकीचे ही नुकसान, केज मांजरसुम्बा रस्त्यावरील घटना…..!
केज दि.२९ – रस्त्याच्या बाजूला चुलती आणि पुतण्या बोलत उभे असताना अचानक भरधाव वेगात आलेल्या कारने जोराची धडक दिल्याने या अपघातात दोघे जखमी झाले. तर दुचाकीचे ही मोठे नुकसान झाल्याची घटना केज – मांजरसुंबा रस्त्यावरील कोरेगाव पाटीजवळ घडली. याप्रकरणी कार चालकाविरद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
कोरेगाव येथील गणेश एकनाथ तांदळे ( वय २१ ) हा तरुण २८ मे रोजी सायंकाळी ६ वाजता दळण दळण्यासाठी कोरेगाव पाटीवर आला होता. त्याची चुलती सरस्वती श्रीराम तांदळे ( वय ४५ ) यांच्या गिरणीवर दळण दळीत असताना गणेश तांदळे व सरस्वती तांदळे हे चुलती – पुतण्या गिरणीसमोर केज – मांजरसुंबा रस्त्याच्या कडेला दुचाकीजवळ बोलत उभे होते. याचवेळी मस्साजोगकडून केजकडे निघालेली कार ( एम. एच. ०१ बीटी ४९७६ ) भरधाव वेगात आली. कारचा चालक गणेश रामराव यादव ( रा. तळेगाव घाट ता. अंबाजोगाई ) याने कार हायगयीने व निष्काळजीपणे चालवून त्यांना जोराची धडक दिली. या अपघातात गणेश तांदळे व सरस्वती तांदळे हे दोघे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी केज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर कारच्या धडकेने दुचाकीचे ही २० हजार रुपयांचे नुकसान झाले. कार चालक गणेश यादव हा त्यांना धडक देऊन कारसह फरार झाला. गणेश तांदळे याच्या फिर्यादीवरून कार चालक गणेश यादव याच्याविरुध्द केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. जमादार दिनकर पुरी हे पुढील तपास करत आहेत.