आपला जिल्हा
बीड जिल्ह्यात जागतिक पर्यावरण दिनी वृक्ष लागवड मोहिम…….!
विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्यासह जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांच्या शासकीय विभागांना सूचना
बीड दि. २९ जिल्ह्यात वृक्ष लागवड मोहिम राबविण्यात येणार असून 5 जून 2021 रोजी जागतिक पर्यावरण दिनी सर्व यंत्रणांनी कार्यक्षमपणे वृक्षलागवडीची अंमलबजावणी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी केले आहे.
कोरोना संसर्गजन्य महामारी मुळे संपूर्ण जगामध्ये थैमान घातले. यामध्ये लाखो लोकांना लागण होऊन प्राण गमवावे लागले. यावर्षी कोरोना साथीच्या दुसऱ्या लाटेत प्राणवायू आॅक्सिजन अभावी होणारे रुग्णांचे हाल सर्वांना दिसले आहेत. त्यामुळे नैसर्गिकरीत्या प्राणवायूची निर्मिती करणारे वृक्षांचे महत्त्व आपण सर्वांनी जाणले आहे. वातावरणातील नैसर्गिक प्राणवायूचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रत्येक व्यक्ती मागे तीन झाडे लावणे व त्यांचे संगोपन करणे यासाठी वृक्षलागवड कार्यक्रम संपूर्ण मराठवाडा विभागात राबविण्यात येणार असून विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी नुकतीच सूचना केली आहे.
सदर वृक्षलागवड कार्यक्रमांमध्ये जिल्हास्तरीय सर्व यंत्रणांनी सक्रियपणे सहभाग नोंदवून कार्यक्षमपणे राबविण्यात येणार आहे यासाठी बीड जिल्ह्यातील सर्व मोकळ्या जागेत वृक्षारोपण व संगोपन करावे असे जिल्हाधिकारी श्री. जगताप यांनी सांगितले आहे. जिल्हाधिकारी यांनी याबाबत जिल्ह्यातील सर्व उपमुख्य कार्यकारी अधिकारी सर्व उपविभागीय अधिकारी सर्व तहसीलदार , सर्व गटविकास अधिकारी, सर्व मुख्याधिकारी नगरपालिका यांची बैठक घेऊन प्रतिमाणसी तीन वृक्ष लागवड करणेबाबत सर्वांना सूचना दिलेल्या आहेत. ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायत पातळीवर प्रत्येक ग्रामपंचायतीने प्रति मानसी तीन याप्रमाणे वृक्ष लागवड आणि संगोपन करावयाचे आहे. नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्रात मुख्याधिकारी नगरपालिका यांनी त्यांच्याकडील मोकळ्या सार्वजनिक जागेवर प्रतिमाणसी तीन वृक्षारोपण करावयाचे आहे. ग्रामीण भागासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांचे पर्यवेक्षणा खाली सर्व ग्रामपंचायतीना सामाजिक वनीकरण आणि वनीकरण विभागाकडून रोपे उपलब्ध करून देण्यात येतील.
सर्व नगरपरिषदा आणि ग्रामपंचायतीमध्ये प्रत्येकी किमान एक घन वृक्ष लागवड म्हणजे मियावाकी करणे बंधनकारक असून रस्ता दुतर्फा नदीनाले चे बाजूला, सार्वजनिक विहिरी जवळ, शेतकऱ्यांचे बांधावर, पडीक जमिनीवर वृक्ष लागवडीचे नियोजन करावे असेही जिल्हाधिकारी यांनी निर्देश दिले आहेत.
वृक्ष लागवड 2021 कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी बीड व अंबाजोगाई व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, विभागीय वन अधिकारी , सामाजिक वनीकरण अधिकारी आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांची जिल्हास्तरीय संनियंत्रण समिती नियुक्त केली असून सर्व उपजिल्हाधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे प्रत्येक तालुक्यासाठी संपर्क अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे. तर विभागीय आयुक्त यांचे आदेशानुसार वृक्षलागवड मोहिमेसाठी उपजिल्हाधिकारी रोहयो व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) जिल्हा परिषद हे नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहेत. जिल्ह्यातील सर्व विभागांचे सर्व अधिकारी कर्मचारी, वृक्षप्रेमी, एनजीओ या सर्वांचाच सक्रिय सहभाग असणार आहे. सदर वृक्षलागवड मोहिमेसाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा सन्मान केला जाणार आहे.
दरम्यान वृक्षलागवड 2021 या कार्यक्रमाचा शुभारंभ ५ जुन रोजी जागतिक पर्यावरण दिनी केला जाणार असून सर्व नगर परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायती मध्ये किमान शंभर रोपे लावून शुभारंभ केला जाणार आहे. वृक्षलागवड मोहिमेत जिल्ह्यातील वृक्षप्रेमी स्वयंसंस्था आणि नागरिकांनी सहभागी होऊन वृक्षारोपण करावे असे आवाहन उपजिल्हाधिकारी रोहयो प्रवीण धरमकर यांनी केले आहे.