हवामान शास्त्र विभागाचा सुधारित अंदाज जाहीर……!
मुंबई दि.२ – देशात यावर्षी जून ते सष्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत 101 ते 107 टक्के इतका पाऊस पडणार असल्याचा दुसरा सुधारित अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने मंगळवारी जाहीर केला. महाराष्ट्रात सलामीलाच म्हणजे जून महिन्यात सरासरी 104 टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.हवामान विभागाने मान्सूनचा पहिला अंदाज 14 मे रोजी जाहीर केला होता. त्यामध्ये देशभरात सरासरी 98 टक्के पाऊस पडेल, असे म्हटले होते. मात्र, 1 जून रोजी (मंगळवारी) हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी दुसरा सुधारित अंदाज जाहीर केला. त्यात देशभरात 101 ते 107 टक्के इतक्या पावसाचा अंदाज जाहीर केला आहे.
1961 ते 2010 या कालावधीतील देशातील पावसाची सरासरी गृहीत धरून हा सुधारित अंदाज वर्तविला आहे. या अंदाजानुसार, 88 सेंटिमीटर म्हणजेच 880 मि.मी. इतका पाऊस पडतो. म्हणजेच 96 ते 104 टक्के एवढे पाऊस पडण्याचे प्रमाण आहे. स्टॅटिस्टिकल सेन्सिबल फोरकास्टिंग मॉडेलचा वापर करून सुधारित मान्सूनचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यानुसार चार टक्के कमी-जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे.
दरम्यान हवामानशास्त्र विभागाने प्रथमच जून महिन्याचा अंदाज जाहीर केला आहे. त्यात म्हटले आहे की, जूनमध्ये मान्सूनचा आगमनाचा कालावधी असल्यामुळे हवामानात वेगाने बदल होत असतात. त्याचा परिणाम पावसावर होतो. यंदा जूनमध्ये देशात 92 ते 108 टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे. तर ‘स्कायमेट’च्या अंदाजानुसार, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या चार महिन्यांत सरासरीच्या तुलनेत 2021 मध्ये 103 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये 5 टक्के कमी किंवा अधिक असू शकते. उत्तर भारत आणि ईशान्य भारतातील काही भागांत संपूर्ण हंगामात पाऊस पडण्याची शक्यता आहे.