आरोग्य व शिक्षण
विद्यार्थ्यासाठी ‘टर्निंग पॉईंट’ असलेली बारावीची परीक्षा अखेर रद्द……!
डी डी बनसोडे
June 3, 2021
मुंबई दि.३ – कोरोनाच्या प्रकोपामुळे भूतो न भविष्यती असे निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे. मागच्या कांही दिवसांपूर्वी दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्याच धर्तीवर आता विद्यार्थ्यांसाठी टर्निंग पॉईंट समजल्या जाणारी बारावीची परीक्षाही रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मागच्या दीड वर्षांपासून कोरोनाने संपूर्ण देशात हाहाःकार माजवला आहे. मागच्या सत्रात दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे कांही पेपर स्थगित करावे लागले होते आणि स्थगित केलेल्या विषयाला सरासरी गुण देऊन विद्यार्थी पुढच्या वर्गात प्रविष्ट केले. मात्र त्यानंतर दोन महिने कांही वर्ग सुरू केल्याचा अपवाद वगळता शाळा महाविद्यालये भरली नाहीत. ऑनलाइन शिक्षण देण्याचा प्रयत्न झाला. मात्र शैक्षणिक सत्र संपल्यामुळे परीक्षा घेणे अपरिहार्य होते.परंतु कोरोनाचा प्रकोप न थांबल्याने शेवटी दहावीच्या परीक्षा रद्द करून मूल्यांकनाचे धोरण ठरवण्यात आले.
तर विद्यार्थ्यांसाठी टर्निंग पॉईंट असलेल्या बारावीच्या परीक्षेचा पेच उभा राहिलेला असताना मागच्या चार दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठक घेऊन सीबीएसई च्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात येत असल्याचे सांगितले. त्यामुळे महाराष्ट्रातही बारावीच्या परिक्षे संदर्भात कॅबिनेट मध्ये चर्चा करून परीक्षा रद्द करण्याचा प्रस्ताव आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे पाठवण्यात आल्याची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली होती. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या आरोग्याला व सुरक्षेला प्राधान्य देत बारावीची परीक्षाही रद्द केल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे टर्निंग पॉईंट असलेल्या परीक्षेचे मूल्यांकन कसे होणार याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागले असून पुढील प्रवेशाच्या अनेक अडचणी निर्माण होणार आहेत.