क्राइम
शेतात पसरलेल्या वायरवर पाय पडल्याने पतिपत्नी चा दुर्दैवी अंत…..!
बीड दि. 7 – दुसऱ्याच्या शेतातून चोरुन लाईट घेतली. त्यासाठी वायरही खराब झालेले. शेतात जात असताना याच वायरवर पाय पडल्याने एका दाम्पत्याचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. ५) तालुक्यातील जरुड येथे घडली. दाम्पत्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या रामकिसन विश्वनाथ काकडे विरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्यात कलम ३०४ नुसार मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जरुड येथील रामकिसन विश्वनाथ काकडे याने शेतात चोरून लाईट घेतलेली आहे. त्यासाठी त्याने खराब वायर वापरून आकडा टाकला होता. वायर पुर्ण खराब झाल्याने केवळ तार राहिली होती. पिंपळनेर परिसरात जोराचे वारे सुटल्याने वायर ढिले होऊन पुष्पा विष्णू काकडे यांच्या शेताजवळील ओढयातील रस्त्यावर पडले होते. त्याठिकाणाहून वैजिनाथ शामराव बरडे (वय ३०) आणि त्यांची पत्नी शोभा वैजिनाथ बरडे (रा. वय ३० जरुड) हे जात असताना शोभा यांचा पाय वायरवर पडला. विद्यूत पुरवठा सुरु असल्यामुळे त्यांना शॉक लागून खाली कोसळल्या. त्यावेळी वैजिनाथ यांना पत्नी खाली का पडली ? हे न समजल्यामुळे त्यांनी पत्नीला उचलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही शॉक लागल्याने दोघांचाही यात मृत्यू झाला. घटनेची माहिती पिंपळनेर पोलीसांना मिळाल्यानंतर घटनास्थळी ठाणेप्रमुख सपोनि.शरद भुतेकर, फौजदार खरात, सानप यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घेऊन घटनेचा पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर नातेवाईकांनी चोरून आकडा टाकणारे रामकिसन विश्वनाथ काकडे यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.
दरम्यान मयत वैजिनाथ बरडे यांचा मुलगा अक्षय बरडे यांच्या फिर्यादीवरून पिंपळनेर पोलीस ठाण्यात कलम ३०४ प्रमाणे आरोपी रामकिसन विश्वनाथ काकडे याच्या विरोधात मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.