यावर्षीही शिक्षणाचा श्रीगणेशा ऑनलाइन शिक्षणानेच होणार, दहावी बारावीचे नियोजन झाले……!
मुंबई दि.१३ – गतवर्षी ज्याप्रमाणे ऑनलाइन शिक्षणावर भर दिला त्याच प्रमाणे यावर्षीही शैक्षणिक सत्राचा श्रीगणेशा ऑनलाइननेच होणार असून जास्तीतजास्त वेळ मुले ही टीव्ही समोर दिसणार आहेत.
कोरोनामुळे गतवर्षी मुंबई आणि ठाण्यातील शाळा भरल्याच नाहीत. राज्यातील काही ठिकाणी सप्टेंबरपासून शाळा सुरू झाल्या. पण त्याही वर्षभर चालल्या नाहीत. यावर्षीही विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा श्रीगणेशा ऑनलाईनच होत आहे. ऑनलाईन शिक्षण विद्यार्थ्यांना कंटाळवाणेे वाटत असले तरीही कोरोनाच्या या दुसर्या वर्षातही ऑनलाईन शिक्षणाशिवाय पर्याय राहिलेला नाही.
प्रत्यक्ष वर्गातील शिक्षणापेक्षा ऑनलाईनचे धडे अधिक प्रभावी व्हावेत म्हणून विद्या परिषदेने विशेष नियोजन केले असून सह्याद्री वाहिनीवरील दररोज पाच तास शिक्षणासाठी मिळणार आहेत. घराघरांत टीव्ही असल्याने यंदा सह्याद्री वाहिनीवरुन शिक्षण देण्याचे नियोजन आहे. यासाठी गतवर्षीपेक्षा यावर्षी जादा तास मंजुरी मिळवली आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक दिनकर टेमकर यांनी दिली.
दरम्यान प्रथम दहावी आणि बारावीच्या अभ्यासक्रमांचे ऑनलाईन नियोजन केले असून त्यानंतर पहिली ते नववी आणि अकरावीच्या वर्गाचे नियोजन केले जाईल. त्याचे वेळापत्रक लवकरच शिक्षक आणि पालकांच्या माहितीसाठी देण्यात येणार असल्याचेही टेमकर म्हणाले.