पुरुषी परंपरेला छेद देत मुलींनी दिला पित्याच्या पार्थिवाला खांदा……!
वाशिम दि.१४ – वाशिम जिल्ह्यातील धोत्रा माळी येथील लक्ष्मणराव इंगळे यांच्या पार्थिवाला पाच मुलींनी खांदा दिला. दोन्हीही मुलांचं निधन झाल्यामुळे लेकींनी मुलाचा वारसा राखला. मंगरुळपीर तालुक्यात धोत्रा माळी येथील लक्ष्मणराव इंगळे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले, मात्र दोन्ही मुलं वारल्यामुळे जुन्या परंपरेला फाटा देत वडिलांच्या अंत्यविधीला त्यांच्या लेकींनी खांदा देऊन मुलाची कमतरता भरुन काढली. त्यांच्या या कार्यामुळे एक नवीन विचारधारा उदयास आली आहे.
वाशिम जिल्ह्यातील धोत्रा माळी येथील लक्ष्मण इंगळे हे ज्येष्ठ समाजसेवक होते. त्यांच्या मृत्यूमुळे एका सेवाभावी वृत्तीच्या व्यक्तीला धोत्रा गावकरी मुकले आहेत. लक्ष्मणराव इंगळे यांना दोन मुलं आणि 8 मुली. त्यांनी सर्व मुलींना सुशिक्षित केलं. परिसरातील कोणत्याही सामाजिक आणि धार्मिक कार्यात ते कायम अग्रेसर राहत होते. ते शेतकरी कुटुंबातील असल्यानं त्यांची शेतीशी कायम नाळ जोडलेली होती. ते भाजीपाला आणि दुग्ध व्यवसाय करत. भाजीपाला आणि दूध विक्रीसाठी ते नित्याने मंगरुळपिर इथं जात असत. त्यांनी आपल्या वयाच्या 85 वर्षांपर्यंत धोत्रा ते मंगरुळपिर असा प्रवास आपल्या सायकलनेच केला. त्यामुळे ते शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या तंदुरुस्त होते.