#Vaccination

जलद लसीकरणासाठी बीड जिल्हा परिषद राबवणार आरोग्य संजीवनी पुरस्कार योजना……!

ग्रामपंचायतींना मिळणार रोख बक्षिसे आणि विशेष विकास निधी

बीड दि.१६ – बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून बीड जिल्हा परिषदेच्या वतीने कोविड-19 लसीकरण प्रक्रियेस गती देण्यासाठी, ग्राम पंचायती, पदाधिकारी, अधिकारी-कर्मचारी यांना प्रोत्साहन देण्यासाठी आरोग्य संजीवनी पुरस्कार योजना जाहीर करण्यात आली आहे.
                कोविड  – 19 या विषाणू आजाराला प्रतिबंध करण्यासाठी बीड जिल्हयामध्ये विविध उपाययोजना राबविण्यात येत असून पात्र नागरीकांचे लसीकरण करणे हा एक अत्यंत महत्वाचा घटक आहे. शासनाच्या आदेशानुसार वय वर्ष 18 वर्षावरील वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करणे अपेक्षित असुन प्रथम टप्प्यामध्ये वय वर्ष 45 वरील नागरिकांचे लसीकरण प्राधान्याने जिल्हयामध्ये करण्यात येत आहे. जिल्हयातील 45 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण  (दोन्ही डोसेस) कालबध्दरित्या पुर्ण करण्याचे दृष्टीने व याकामी उत्कृष्ट काम करणारे जिल्हयातील ग्रामपंचायती, पदाधिकारी व अधिकारी / कर्मचारी यांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने  वैयक्तिक व सामुहीक पातळीवर प्रोत्साहन देण्याकरिता जिल्हयाचे .ना. श्री. धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य संजीवनी पुरस्कार योजना 2021 राबविण्याचा निर्णय बीड जिल्हा परिषदेने घेतला आहे.
                या योजनेतंर्गत कोवीड-19 लसीकरणामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतींना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात रू. 30,000/- ते 50,000/- पर्यंतचे रोख पारितोषिक व रू.10 लक्ष ते 30 लक्ष इतका विकास निधी जिल्हा परिषदेच्या विविध योजनांमधून दिला जाणार आहे. या करिता ग्रामपंचायतींची 5000 हून अधिक, 2000 ते 5000 पर्यंत व 2000 पेक्षा कमी अशी लोकसंख्येनुसार तीन विभागात विभागणी करून प्रत्येक विभागात प्रथम येणाऱ्या तीन ग्रामपंचायतींची निवड जिल्हा स्तरीय बक्षीसासाठी केली जाणार आहे. तसेच तालुकास्तरावर देखील एका ग्रामपंचायतीची स्वतंत्ररित्या निवड करून त्या ग्रामपंचायतीस रोख रक्कम रू. 25,000/- व रू. 10 लक्ष इतका विकास निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्याचबरोबर या योजनेंतर्गत उत्कृष्ट काम करणारे गट विकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी ( ANM, MPW, HA, LHV ), ग्रामसेवक / ग्राम विकास अधिकारी यांना देखील गौरवचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचारी जसे समुदाय आरोग्य अधिकारी, गट प्रवर्तक व आशा कार्यकर्ती यांना देखील रोख पारितोषिक व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. या योजनेतंर्गत जिल्हयामध्ये लसीकरणाची चळवळ उभी करण्याकरिता परिश्रम घेणारे सरपंच, पंचायत समिती सदस्य व जिल्हा परिषद सदस्यांना देखील त्यांच्या योगदानाबद्दल विशेष पुरस्कारांनी गौरविण्यात येणार आहे.
               आरोग्य संजीवनी पुरस्कार योजनेचा कालावधी 30 ऑगस्ट अखेरपर्यंत असा असून पुरस्कारासाठी पात्र होण्याकरिता संबंधित ग्रामपंचायतीमधील वय वर्ष 45 वरील किमान 90% नागरीकांचे प्रथम व व्दितीय असे दोन्ही डोस झाले असणे अनिवार्य आहे. प्राप्त नामांकनांची छाननी करण्याकरीता तालुका व जिल्हा स्तरावर निवड समिती स्थापन करण्यात येणार असून 15 सप्टेंबर 2021 अखेर पुरस्कारांची घोषणा करण्यात येणार आहे.
              दरम्यान जिल्हयातील सर्व ग्रामपंचायतींनी आरोग्य संजीवनी पुरस्कार 2021 या योजनेमध्ये उस्फुर्तपणे सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिवकन्या शिवाजीराव सिरसाट, उपाध्यक्ष तथा आरोग्य व शिक्षण सभापती बजरंग सोनवणे, बांधकाम सभापती जयसिंग सोळंके, समाजकल्याण सभापती कल्याण आबुज, कृषी व पशुसंवर्धन सभापती  सविता मस्के, महिला व बालविकास सभापती यशोदाबाई जाधव तसेच सर्व सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य यांनी केले आहे. तसेच कोवीड-19 च्या संभाव्य तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी करण्याकरीता जलदगतीने पात्र नागरीकांचे लसीकरण होणे आवश्यक असल्याने सर्व ग्रामपंचायती, अधिकारी व कर्मचारी यांनी आरोग्य संजीवनी पुरस्कार योजनेमध्ये भाग घेऊन कोवीड-19 लसीकरण मोहीम यशस्वी करावी असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close