सारथीला जेवढे पैसे मिळतील तेवढेच महाज्योतीलाही मिळतील, मंत्री विजय वडेट्टीवार यांचा दावा……!
नागपूर दि.२७ – ओबीसी आरक्षणासाठी पार पडलेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या चिंतन बैठकीत मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मोठा दावा केलाय. कोरोनाची लाट गेल्यावर ओबीसी समाजाचा पहिला विराट मोर्चा औरंगाबादेत होणार असल्याची घोषणा विजय वडेट्टीवारांनी केली आहे. जेवढे पैसे सारथी संस्थेला मिळतील तेवढेच पैसे महाज्योतीलाही मिळतील, मी बसलोय इथे, असा विश्वासही वडेट्टीवार यांनी दिलाय. आमच्या खात्यात पैसे आले तर आम्ही ते परत जाऊ देणार नाही, असंही वडेट्टीवार म्हणाले.
नागपुरात पार पडलेल्या ओबीसी चिंतन बैठकीत विजय वडेट्टीवार यांनी महत्वाचे मुद्दे उपस्थित केले. महाराष्ट्रात तीन दिवस फिरलो तरी 25 लाखांची सभा होईल. सरकार झुकती है झुकानेवाला चाहिए, असं वडेट्टीवार म्हणाले. आपल्या मंत्रिपदावरुनही वडेट्टीवार यांनी नाराजी व्यक्त केलीय. ओबीसींच खातं मिळालं तेव्हा चपराशीही नव्हता. उधारीवर आणि समाज कल्याण विभागाच्या भरवशावर हे खातं चालवतो. काही दिवस रुसलो होतो, मग वाटलं चूक झाली. विरोधी पक्षनेता होतो, ओबीसींच नेतृत्व करतो. वाटलं होतं महसूल खातं मिळेल पण भेटलं हे खातं. मी ओबीसी आहे ना, महसूल खातं का मिळेल? पंकजाताईंनाही ग्रामविकास खातंच मिळालं होतं, अशा शब्दात वडेट्टीवार यांनी खंत व्यक्त केलीय. तसेच निवडणूका झाल्यावर कोरोना वाढला तर निवडणूक आयोगाला जबाबदार धरा आणि गरज भासल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, अस आपण मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे. माझं काय होईल ते होईल पण ओबीसीच्या मुद्द्यावर मी शांत बसणार नाही, असा इशाराही वडेट्टीवार यांनी यावेळी दिलीय.
दरम्यान इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग या कमकुवत घटकांच्या सर्वसमावेशक सर्वांगीण शाश्वत विकासाकरीता “महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था” (महाज्योती) या स्वायत्त संस्थेची स्थापना ८ ऑगस्ट २०१९ ला करण्यात आली. ही संस्था महाराष्ट्रातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग या घटकांतील सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकास, संशोधन, रोजगारभिमुखता वृध्दी, कौशल्य विकास, स्वयंरोजगार, ग्रामीण विकास, शेती विकास, व्यक्तिमत्व विकास , स्पर्धात्मकता विकास, सामाजिक ऐक्य व सलोखा आणि तत्सम क्षेत्रांमध्ये विविध उपक्रम राबवून आधुनिक कटिबद्ध समाज निर्मितीकरीता स्वतःस समर्पित करण्यास कटिबद्ध असल्याचं सरकारकडून सांगण्यात येतं.