फळविक्रेते युसुफखान ते विश्वविक्रमी दिलीपकुमार……!
मुंबई दि.७ – तब्बल पाच दशकं आपल्या जबरदस्त अभिनयाच्या जोरावर बाॅलिवूड गाजवणारे दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन झालं आहे. वयाच्या 98 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. 50 वर्ष त्यांनी त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांना मनोरंजन केलं होतं. दिलीपकुमार यांच्या निधनाने बॉलिवूडसह जगभरातील चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. ट्रॅजेडी किंग म्हणून त्यांची बॉलिवूडमध्ये ओळख होती.
11 डिसेंबर, 1922 साली दिलीप कुमार यांचा पाकिस्तानात जन्म झाला. फाळणीनंतर त्यांच्या परिवाराने भारतात येणं पसंत केलं. दिलीप कुमार यांचं मूळ नाव मोहम्मद युसूफ खान होतं. 1940मध्ये दिलीप कुमार पुण्यातील एका कँटीनचे मालक व फळविक्रेते होते. लहानपणापासून अभिनयाची आवड असल्यानं त्यांनी चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला. 1944 मध्ये ‘ज्वार भाटा’ या चित्रपटाद्वारे दिलीपकुमारांनी बॉलिवूडमध्ये सुरुवात केली. ज्वारा भाटा चित्रपटाचे लेखक भगवतीचरण वर्मा यांनी त्यांचे युसुफ खान हे नाव बदलून दिलीप कुमार केले आणि तेव्हापासून ते दिलीप कुमार या नावाने ओळखू लागले. मात्र ‘ज्वार भाटा’ हा चित्रपट अपयशी ठरला होता. त्यानंतर आलेला ‘मिलन’ हा त्यांचा चित्रपट सुपरहिट ठरला होता. बाॅलिवूड प्रदार्पण केल्यानंतर त्यांनी जोगन, बाबुल, हलचल, दीदार, तराना, दाग, संगदील, शिकस्त, अमर, उडन खटोला, इन्सानियत या चित्रपटात काम केलं. त्यानंतर त्यांची ओळख संपुर्ण भारतात झाली. लोक त्यांना ट्रॅजेडी किंग म्हणून ओळखू लागले.
सर्वोत्तम अभिनेत्याचा पहिला फिल्मफेअर पुरस्कार दिलीपकुमार यांना मिळाला होता. सर्वोत्तम अभिनेत्याचे सर्वाधिक आठ फिल्मफेअर पुरस्कारही दिलीपकुमार यांच्याच नावावर आहे. त्यांना 50च्या दशकात हिरो मानलं जात होतं. तर 60च्या दशकात त्यांच्या जीवनात काही चढउतार आले. त्यानंतर त्यांनी बाॅलिवूडमध्ये कमबॅक केलं. 1960 साली आसिफ यांचा ऐतिहासिक चित्रपट ‘मुगल-ए-आजम’ मध्ये राजकुमार सलीमची भूमिका निभावली होती. या चित्रपटाने दिलीप कुमार यांना एका मोठ्या उंचीवर नेऊन ठेवलं.
दरम्यान, दिलीप कुमार राज्यसभेचे सदस्य होते. 1994 साली त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात आलं. तसेच त्यांना पाकिस्तानातील सर्वात मोठा पुरस्कार ‘निशान-ए-इम्तियाज’नेही सन्मानित करण्यात आलंय. दिलीप कुमार यांनी हिंदी सिनेसृष्टीत जास्त पुरस्कार प्राप्त केल्याचा विश्वविक्रम नोंदवला आहे.