जगात जर्मनी अन भारतात परभणीची पुन्हा प्रचिती……! रेकॉर्डब्रेक पाऊस….!
परभणी दि.१३ – मराठवाड्यात बहुतांश जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावलीय. परभणी जिल्ह्यात तर आभाळच कोसळलय. ह्या पावसात शेतीचं, जनावरांचं, पीकाचं नुकसान झाल्याचं वृत्त आहे. ओढ्या नाल्या, नद्यांना आलेल्या अचानक पुरामुळे जीवितहाणी मोठ्या प्रमाणात झाल्याचं समोर येतं आहे.
परभणी जिल्ह्यातील शिर्सी बुद्रुक गावात 233 मेंढ्या दगावल्या आहेत. ह्या सर्व मेंढ्या 10 मेंढपाळांच्या आहेत. सर्वच्या सर्व मेंढ्या अचानक आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचं मेंढपाळांनी सांगितलंय. एवढ्या मोठ्या प्रमाणात पावसामुळे मेंढ्या मरण्याची कदाचित ही पहिलीच घटना असेल. ह्या एका घटनेमुळे मेंढपाळांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. त्याची भरपाई केली जावी अशी मागणी होत आहे.
दरम्यान परभणी हा तसा कोरडा जिल्हा म्हणून ओळखला जातो. पण इथं उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असे तीनही ऋतू तीव्र असतात. नाही पडला तर पाऊसच पडत नाही आणि एकदा पडायला लागला तर थांबत नाही असे प्रसंग इथं अनेक वेळेस घडतात. त्याचीच पुन्हा प्रचीती आलीय. 24 तासात तब्बल 232 मिमी. एवढ्या रेकॉर्डब्रेक पावसाची नोंद झालीय. विशेष म्हणजे हा पाऊस जिल्ह्यातल्या बहुतांश भागात आहे.