केज दि.१३ – तुझ्या आईला नातेवाईकाकडे का जाऊ दिले ? असे म्हणत पित्याने मुलाला शिवीगाळ करीत चाकूने हल्ला केल्याची घटना केज शहरात घडली. याप्रकरणी चुलते – पुतण्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केज शहरातील जुन्या सरकारी गोडाऊनच्या परिसरात वास्तव्यास असलेले राम बब्रू उर्फ बब्रुवान काळे ( वय २१ ) हा तरुण ११ जुलै रोजी रात्री ७ वाजेच्या सुमारास घरी असताना त्याचे वडील बब्रू उर्फ बब्रुवान शामराव काळे हे दारू पिऊन घरी आले. त्यांनी मुलाला तुझ्या आईला कुठे पाठविलेस अशी विचारणा करीत शिवीगाळ करण्यास सुरुवात केल्याने राम काळे याने आई नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी गेल्याचे सांगितले. त्यानंतर बब्रू काळे याने तु तिला का जाऊ दिले असे म्हणत खिशातील चाकू काढून राम काळे याच्या उजव्या कानाच्या पाठीमागे मानेवर मारून गंभीर जखमी केले. तर त्यांचा पुतण्या अमोल राजेंद्र काळे याने चुलत्याच्या अंगाला हात लावल्यास जीवे मारून टाकीन अशी धमकी दिली. अशी फिर्याद राम काळे याने दिल्यावरून बब्रू काळे व अमोल काळे या दोघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे हे पुढील तपास करत आहेत.
तहसीलला अर्ज दिल्यावरून घरात घुसून मारहाण ; खिशातील पैसे काढून घेतले
केज दि.१३ – तू शेतातील पाण्यासंदर्भात आमच्या विरोधात तहसीलला अर्ज का दिलास ? असे म्हणत घरात घुसून तिघांनी एका शेतकऱ्यास लोखंडी रॉड व काठीने बेदम मारहाण करीत खिशातील पैसे काढून घेतल्याची घटना केज तालुक्यातील नाव्होली येथे घडली. याप्रकरणी केज पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
नाव्होली येथील शेतकरी तानाजी रंगनाथ जगताप ( वय ४१ ) हे १२ जुलै रोजी सकाळी नऊ वाजता घरी असताना फुलचंद नारायण बिक्कड, सोनाजी फुलचंद बिक्कड, तानाजी फुलचंद बिक्कड या तिघा बापलेकांनी तू शेतातील पाण्यासंदर्भात आमच्या विरोधात तहसीलला अर्ज का दिलास असे कारण काढून घरात घुसून फुलचंद याने हातातील काठीने तर सोनाजी याने लोखंडी रॉडने तानाजी जगताप यांच्या पाठीत मारून मुक्कामार दिला. तर तानाजी बिक्कड याने त्यांच्या गचुऱ्याला धरून खाली पाडून खिशातील पाच हजार रूपये काढुन घेतले. त्यांनी तुम्हाला गावातून हुसकुन लावूत व तुमचेविरोधात खोटी विनयभंगाची केस करू. पुन्हा जर तुम्ही नादाला लागलात तर जिवेच मारून टाकूत अशा धमक्या दिल्या. अशी फिर्याद तानाजी जगताप यांनी दिल्यावरून फुलचंद बिक्कड, सोनाजी बिक्कड, तानाजी बिक्कड या तिघा जणांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस नाईक सानप हे तपास करत आहेत.