चार कोटीहून अधिकचा मुद्देमाल जप्त……!
गेवराई दि.१९ – तालुक्यातील गोदावरी नदीतून अवैधरित्या वाळू उपसा करुन वाहतूक सुरुच आहे. दरम्यान या अवैधरित्या होणाऱ्या वाळू वाहतुकीविरोधात सोमवारी पहाटे तहसीलदार सचिन खाडे यांनी मोठी कारवाई केली. तब्बल पंधरा हायवासह जवळपास चार कोटीहून अधिक रुपयांचा ऐवज या कारवाईत जप्त करण्यात आला आहे. हि कारवाई तालुक्यातील राक्षसभुवन याठिकाणी सकाळी करण्यात आली असून जप्त केलेली वाहने राक्षसभुवन येथील विश्रामगृहात लावण्यात आली आहेत.
गेवराई तालुक्यातून गेलेल्या गोदावरी नदीतून ठिकठिकाणी सातत्याने मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या वाळू उपसा करुन ती वाहतूक होते. महसूल विभाग सातत्याने कारवाई करत असले तरी वाळू माफिया या कारवायांना न जुमानता अवैध वाळु करुन ती टिप्पर तसेच ट्रँक्टरद्वारे वाहतूक करतात. यामुळे मोठ्या प्रमाणावर वाळूचे उत्खनन होत आहे, शिवाय शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल देखील बुडत आहे. सातत्याने या होणाऱ्या वाळु उपशा विरोधात आयुक्त सुनिल केंद्रेकर यांची देखील नजर असून त्यांनी या बाबतीत संबंधीत तहसीलदार आणि उपविभागीय अधीकारी यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश पारीत केलेले आहेत. मात्र तरीही प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नजरा चुकवून राजरोसपणे वाळू उपसा सुरुच आहे. सोमवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील राक्षसभुवन याठिकाणी वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळताच गेवराईचे तहसीलदार सचिन खाडे यांच्या पथकाने त्याठिकाणी जाऊन मोठी कारवाई केली. यामध्ये तब्बल पंधरा हायवा गाड्यासह चार कोटीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन ही सर्व वाहने राक्षसभुवन याठिकाणी असलेल्या शासकीय विश्रामगृहात लावण्यात आली आहेत. पुढील कारवाई करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती तहसीलदार सचिन खाडे यांनी दिली.