#Judgement
पोलीस कर्मचाऱ्यास दुखापत करून शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी आरोपीस तीन वर्ष सश्रम कारावासासह दंडाची शिक्षा……!
बीड येथील मा. अतिरीक्त सत्र न्यायालय 3 रे, के. आर. पाटील यांचा निकाल
बीड दि.३० – मुलीची छेड काढणाऱ्या आरोपीस प्रतिबंध केला असता आरोपीने पोलीस कर्मचाऱ्यांवर धारदार शस्त्राने हल्ला करून जखमी करत शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी बीड येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपीस तीन वर्षे सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
अधिक माहिती अशी की, दिनांक 11/05/2018 रोजी 06.50 वाजण्याचे सुमारास लोकसेवक फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल सुशिलकुमार मुकुंद कोळेकर हे पोलीस अधीक्षक कार्यालय, बीड येथे आपले कर्तव्य पार पाडीत असतांना एक अनोळखी मुलगी धावत धावत भितीपोटी पोलीस अधीक्षक कार्यालयात आली. तिच्या पाठीमागे यातील आरोपी अब्दुल रहेमान ऊर्फ एरार पि नवाब शकील हाश्मी, वय-38 वर्ष, रा.न्यु. शहेनशाह नगर, आक्सा मस्जिद जवळ, बीड हा तिची छेड काढत कत्ती सारखे धारधार हत्यारासह पोलीस अधीक्षक कार्यालयाचे प्रवेशद्वाराजवळ आला. घडत असलेला प्रकार समजताच फिर्यादी पोलीस कर्मचारी एस. एम. कोळेकर यांनी आरोपीतास थांब!, आत मध्ये येऊ नकोस म्हणुन अडवले. मात्र असे म्हणताच आरोपीने धारधार कत्ती घेवुन फिर्यादीस जिवे मारण्याचे उद्देशाने त्यांचेवर प्राणघातक हल्ला केला. त्यावेळी फिर्यादीने बाजूला सरकून वार उजवे हातावर घेतल्याने उजवे हाताच्या अंगठ्याला गंभीर दुखापत झाली. तेव्हा आरडा ओरडा ऐकुण पोलीस नियंत्रण कक्षातील अधिकारी घटनास्थळावर आले असता, आरोपीने त्यांच्याही अंगावर शस्त्र घेऊन जाऊन अंगावर कुंड्या फेकून त्यानाही धकाबुक्की केली. घडलेल्या प्रकरणाबाबत फिर्यादी पोलीस कर्मचाऱ्याच्या फिर्यादीवरून पोलीस ठाणे बीड शहर अंतर्गत गु.र.नं. 105/2018 कलम 307,332,353 भादंवि सह कलम 4/27 भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी, बीड शहर तथा पोलीस निरीक्षक सैय्यद सुलेमान यांनी करून आरोपीताविरुध्द दिसून येत असलेल्या सबळ पुराव्याच्या आधारावर मा. न्यायालयास अंतीम दोषारोप पत्र सादर केले.
दरम्यान प्रकरणाची सुनावणी मा. अतिरीक्त सत्र न्यायालय 3 रे, बीड के. आर. पाटील यांच्या न्यायालयात झाली. एकंदरीत झालेल्या सुनावणीत आरोपीताविरूध्द सबळ पुरावा दिसून येत असल्याने मा. न्यायालयाने आरोपीतास कलम 353 भादंवि मध्ये दोन वर्ष सश्रम करावास व 1,000/- रु. दंड, दंड न भरल्यास एक महिना अतिरीक्त साधा कारावास तसेच कलम 332 भादंवि मध्ये तीन वर्ष साधा करावास व 3,000/- रु. दंड, दंड न भरल्यास तीन महिने अतिरीक्त साधा कारावास आणि कलम 336 भादंवि व 426 भादंवि मध्ये प्रत्येकी तीन महिने साधा कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
सदर शिक्षा अरोपीतास एकत्रीत भोगावयाच्या आहेत. नमुद प्रकरणात सरकारी पक्षाची बाजू सहा. सरकारी वकील आर. बी. बिरंगल यांनी मांडली तर पैरवीचे कामकाज पोह / 657 एस. आर. डोंगरे यांनी पाहिले.