ब्रेकिंग
शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी तीन वर्ष साधा कारावासाची शिक्षा व ३००० रूपये दंड…….!
बीड येथील मा. अतिरीक्त सत्र न्यायालय ३ रे, श्री. के. आर. पाटील यांचा निकाल
बीड दि.६ – शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी एकास बीड येथील मा.अतिरिक्त सत्र न्यायालय 3 रे श्री.के.आर.पाटील यांनी तीन वर्षे साध्या कारावासाची शिक्षा व तीन हजार रुपये दंड ठोठावला आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, दिनांक ३०/११/२०१७ रोजी आरसीपी पोलीस मुख्यालय बीड येथे नेमणूकीस असलेले पोलीस अंमलदार शुभम बलभीम देखणे हे त्यांच्या सहकाऱ्यांसोबत ०८.०० ते २०.०० वा. पर्यंत पोलीस ठाणे बीड शहर हद्दीत पेट्रोलींग करत असताना सकाळी ११.४० वा.चे. सुमारास पोलीस नियंत्रण कक्ष बीड येथून जिल्हा रूग्णालय, बीड येथे गोंधळ चालू आहे तिथे तात्काळ जावे असा कॉल आला असता ते व त्यांचे सहकारी जिल्हा रुग्णालय बीड येथे गेले. यातील आरोपी नामे अब्दुल रहमान ऊर्फ एरार नवाब हाशमी, वय २९ वर्ष, रा. शहेंशाहनगर बीड हा रूग्णालयात चिठ्ठी काढण्याच्या काऊंटवर लोकांशी वाद घालत असल्याचा दिसून आला. त्यामुळे त्यास ताब्यात घेवून सरकारी दवाखाना बीड येथील पोलीस चौकी येथे नेले. तेथे आरोपीस विचारपूस केली असता त्याने फिर्यादीस धक्काबुक्की करून फिर्यादीचे शर्ट फाडले व शिवीगाळ केली व तसेच आरोपीने पोलीस चौकीच्या खिडकीच्या काचा फोडून सरकारी मालमत्तेचे नुकसान केले. घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने पोशि/ २१९० एस. बी. देखणे यांनी पोलीस ठाणे बीड शहर अंतर्गत गु.रं. नं. ३१० / २०१७ कलम ३५३, ३३२, ४२७, ५०४ भादंवि सह ३ सार्वजनिक मालमत्ता विद्रोपीकरण प्रतिबंधक अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक एस.एस. बिराजदार यांनी करून आरोपी विरुध्द दिसून येत असलेल्या सबळ पुराव्याच्या आधारावर मा. न्यायालयास अंतीम दोषारोप पत्र सादर केले. प्रकरणाची सुनावणी मा. अतिरीक्त सत्र न्यायालय ३ रे, बीड यांच्या न्यायालयात झाली. मा. न्यायालयाने नमुद आरोपीतास कलम ३५३ भादंवि मध्ये दोषी धरून दोन वर्ष साधा कारावास व १०००/- रू. दंड, कलम ३३२ भादंवि मध्ये ३ वर्ष साधा कारावास व २०००/- रू. दंड व कलम ४२७ भादंवि मध्ये १ वर्ष साधा कारावास व ५००/- रू. दंड अशी शिक्षा सुनावली आहे. सदर शिक्षा आरोपीतास एकत्रित भोगावयाच्या आहेत. नमुद प्रकरणात सरकारी पक्षाची बाजू सहा. सरकारी वकील ए. बी. तिडके यांनी मांडली तर पैरवीचे कामकाज पोह/ ६५७ एस. आर. डोंगरे यांनी पाहीले.