आयपीएल पुन्हा सुरू होणार, मात्र नियमात केला मोठा बदल…….!
मुंबई दि.१० – आयपीएल 2021 या स्पर्धेला 9 एप्रिलला सुरुवात झाली होती. परंतु, आयपीएल दरम्यान खेळाडूंना कोरोनाचा संसर्ग झाल्यानं आयपीएल थांबवण्यात आली. त्यातच काही परदेशी खेळाडूंनी चालू स्पर्धेतून घरी जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आयपीएल स्थगित करण्यात आली. मात्र, आता कोरोना रूग्णसंख्या आटोक्यात येत असल्यानं उर्वरित आयपीएल पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी आता उर्वरित आयपीएलसाठीच्या सामन्यांसाठी नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
बीसीसीआयने खेळाडूंच्या आरोग्याची सुरक्षितता लक्षात घेऊन आयपीएल सामन्यांआधी नवी नियमावली जाहीर केली आहे. या नियमांमध्ये एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. फलंदाजाने चेंडूवर षटकार खेचल्यानंतर चेंडू स्टेडियमबाहेर जातो. तेव्हा तो चेंडू खेळण्यास पुन्हा पाठवल्यानंतर अंपायरकडून सॅनिटाईज केला जात होता. त्यानंतर त्याच चेंडूने उर्वरित सामना खेळला जात होता. आता या नियमात बदल करण्यात आला आहे.
नवीन नियमानुसार जर चेंडू स्टेडियमच्या बाहेर गेला तर त्या जागी नव्या चेंडूने सामना सुरू करण्यात येणार आहे. स्टेडियममध्ये पडलेला चेंडू चौथ्या अंपायरकडे दिला जाईल आणि त्यानंतर तो चेंडू व्यवस्थितपणे सॅनिटाईज करून सामन्यासाठी गरज लागेल तेव्हा पुन्हा वापरण्यात येईल. इंडियन एक्सप्रेसने या नव्या नियमावलीबद्दल माहिती दिली आहे. खेळाडूंच्या सुरक्षेसाठी नियमात बदल केल्याचं सांगितलं जात आहे.
दरम्यान, 19 सप्टेंबरपासून आयपीएलचे उर्वरित सामने खेळवण्यात येणार आहे. आयपीएलचा अंतिम सामना हा 15 ऑक्टोबर रोजी होणार आहे. आयपीएलचा पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यामध्ये होणार आहे. आयपीएल पुन्हा सुरू होणार असल्यानं आता पुन्हा क्रिकेटप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण आहे.