क्राइम
पीडित महिलांना वेश्याव्यवसायास प्रवृत्त करणाऱ्या महिलेला अटक, दोन पीडितांची सुटका……!
बीड दि.१० – स्वतःच्या फायद्यासाठी पीडित महिलांना वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त करणाऱ्या एका ४५ वर्षीय महिलेस बीड पोलिसांच्या विशेष पथकाने ताब्यात घेतले असून दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. शहरातील भर वस्तीत चालणाऱ्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
बीड पोलिसांच्या विशेष पथकाला बीड शहरातील पालवन चौक परिसरातील एका घरात वेश्याव्यवसाय चालत असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून विशेष पथकाने दि.९ ऑगस्ट रोजी 500 रुपयांच्या चार नोटा देऊन दोन डमी ग्राहक पाठवले होते. सदरील ठिकाणी एका महिलेने ते पैसे घेऊन डमी ग्राहकांसोबत पिडित महिलांचा सौदा केला. परंतु त्या दरम्यान (4.45 वा.) विशेष पथकाने सदरील घरात छापा मारून वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त करणाऱ्या महिलेला ताब्यात घेत दोन पिडीत महिलांची सुटका केली. सदरील महिलेजवळ डमी ग्राहकाने दिलेल्या 500 रुपयांच्या चार नोटा, ग्राहकांना संपर्क करण्यासाठी वापरण्यात येणारा मोबाईल, निरोधची पाकिटे इत्यादी मिळून सात हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. एपीआय विलास हजारे यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक साईनाथ ठोंबरे हे करत आहेत.
दरम्यान शहरातील भर वस्तीत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश झाल्यामुळे खळबळ उडाली असून आश्चर्य व्यक्त होत आहे.