शाळा सुरू करण्यास प्राधान्य द्या अन्यथा…….!
नवी दिल्ली दि.११ – जगभरातल्या देशांनी शाळा सुरु करण्याला प्राधान्य द्यावं असं आवाहन जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी केलं आहे. कोरोना काळामुळे गेल्या वर्षीच्या मार्चपासून जगभरातील शाळा बंद आहेत. यामुळे मुलांच्या मानसिक, शारीरिक आणि नव्या गोष्टी शिकण्याच्या क्षमतेवर दीर्घकालीन परिणाम होण्याची शक्यता आहे असंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, कोरोना मुक्त गावांमध्ये 15 जुलैपासून इयत्ता आठवी ते बारावी वर्ग सुरू करण्यात आले होते. त्यानंतर या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव नाही अशा ठिकाणी ग्रामीण भागांमध्ये इयत्ता पाचवी ते सातवीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाकडून घेण्यात आला आहे. तर शहरी भागांमध्ये इयत्ता आठवी ते बारावी चे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे व इतर शहरी भागात कोरोना परिस्थिती विचारात घेऊन शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्याबाबत संबंधित महापालिका आयुक्त यांना अधिकार असणार आहे. तर 11 जिल्ह्यात शाळा सुरू करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी निर्णय घेणार आहेत.