शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला राज्यमंत्री मंडळाची स्थगिती, टास्क फोर्स च्या बैठकीत होणार निर्णय……!
मुंबई दि. 11 – राज्य सरकारने राज्यातील सर्व शाळा येत्या 17 ऑगस्टपासून सुरु करण्याचा निर्णय काल (10 ऑगस्ट) घेतला होता. संबंधित निर्णय काल संध्याकाळी जाहीर करण्यात आला होता. मात्र, अवघ्या 24 तासात या निर्णयाला राज्य सरकारने ब्रेक दिला आहे. शाळा-कॉलेज उघडण्याबाबतचा अंतिम निर्णय टास्क फोर्ससोबत चर्चा करुन मुख्यमंत्री घेतील, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सांगितलं. त्यामुळे याबाबतचा अंतिम निर्णय उद्यापर्यंत येण्याची शक्यता आहे.
“शाळा आणि कॉलेज संदर्भात नोटीफिकेशनमध्ये आम्ही स्पष्ट केलं आहे. राज्यभरातील त्या त्या भागातील प्रशासन शाळा-कॉलेज उघडण्याबाबत निर्णय घेतील. टास्क फोर्स आणि पिडीयाट्रीक टास्क फोर्स तसेच पहिल्या कोरोनाच्या लाटेपासून असलेला टास्क फोर्स सर्वांनीच शाळा-कॉलेज सुरु करण्यास विरोध दर्शवला आहे. याच अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्स आणि शिक्षण विभागाचे अधिकरी यांच्यासोबत संध्याकाळी बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्या बैठकीत शाळा-कॉलेजबाबत अंतिम निर्णय होईल”, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.
तर राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाला आहे. तसंच निर्बंधांच्या विरोधात सर्वसामान्य नागरिक, व्यापारी, लोकप्रतिनिधी आदींकडून मोठा विरोध होत असताना राज्य सरकारनं एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात 15 ऑगस्टपासून मोठी शिथिलता देण्यात येणार आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी त्याबाबत घोषणा केली आहे. आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यात कोरोना निर्बंधांत शिथिलता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हॉटेल, रेस्टॉरंट, विवाह सोहळे आदिंना मोठा दिलासा देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.