…….तोपर्यंत कुणी मला फेटा बांधायचा नाही…….!
बीड दि.१७ – जोपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय मार्गी लागत नाही, तोपर्यंत गळ्यात हार घालणार नाही आणि ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पूर्ववत होत नाही, तोपर्यंत मला कुणी फेटा बांधायचा नाही, अशी घोषणाच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केली आहे. बीडमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पंकजा मुंडेंनी आपल्या भाषणादरम्यान ही मोठी घोषणा केली आहे. या बैठकीला पदाधिकाऱ्यांची मोठी गर्दी होती.
“मी ही लढाई लढायचं ठरवलं आहे. रोज-रोज-रोज या गोष्टींना… आपण बाजूला केलंच पाहिजे. बीड जिल्ह्याने एक सुंदर, वेगळं उदाहरण घालून दिलं पाहिजे. मी सांगते आज, कोणीही मला इथून यापुढे हार घालायचा नाही, जोपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय मार्गी लागत नाही, पंकजा मुंडे गळ्यामध्ये हार घालून घेणार नाही. आणि जोपर्यंत ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा विषय पूर्ण होत नाही, तोपर्यंत कोणी माझ्या डोक्यावर फेटा बांधायचा नाही” असं पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांना निक्षून सांगितलं.
“अरे हेच तर पाहिजे, ज्याला आज खुर्चीवर बसायचंय, त्याला हेच पाहिजे. आपसात भांडा आणि मरा, छत्रपती शिवाजी महाराजांनी हे नाही केलं. सोशल इंजिनिअरिंग करणारा जगातील पहिला माणूस कोण असेल तर ते छत्रपती शिवराय आहेत, या महाराष्ट्रातले. मुंडे साहेबांना विचारलं तुमचं राजकीय गुरु कोण, तर ते म्हणायचे मी राजकारण करताना छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्य कारभार डोळ्यासमोर ठेवतो.” असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.