आगामी पाच दिवसांत जोरदार पाऊस…….!
मुंबई दि. 3 – आगामी पाच दिवस राज्यासाठी महत्त्वाचे असून बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार राज्यात येत्या पाच दिवसांत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी मुसळधार पाऊस बरसण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
राज्यात मागील काही दिवसांपासून पावासाने दडी मारली होती. मात्र बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे मागील काही दिवसांपासून पावसाचे पुनरागमन झाले आहे. येत्या पाच दिवसांत राज्यात ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे. कोकणात 6 आणि 7 सप्टेंबर रोजी काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची दाट शक्यता आहे. तसेच राज्यात इतर भागात विजांच्या कडकडाट तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस बरसण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. एकंदरित आगामी पाच दिवस बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे संपूर्ण राज्यभर त्याचा प्रभाव जाणवणार आहे.
दरम्यान, पुढील पाच दिवस राज्यात सर्वदूर पाऊस बरसण्याची शक्यता आहे. पावसाची शक्यता लक्षात घेता हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे तसेच योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तर आज राज्यातील एकूण 15 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. यामध्ये मराठवाडा, विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा समावेश आहे. हिंगोली, बीड, परभणी, लातूर, उस्मानाबाद, वाशिम, अकोला, बुलडाणा, नांदेड, वर्धा, अमरावती, नागपूर, जालना, औरंगाबाद, या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आलाय.