करुणा शर्मा परळीत स्थानबद्ध, गाडीत पिस्तुल ही सापडले…..!
परळी दि.5 – गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला वाद चव्हाट्यावर आला आहे. अशातच आता सामाजिक कार्यकर्त्या करुणा शर्मा यांना स्थानबद्द केल्याची माहिती समोर आली आहे. आज करूणा शर्मा पत्रकार परिषद घेऊन गौप्यस्फोट करणार होत्या मात्र, पोलिसांनी त्यांना स्थानबद्ध केल्यानं आता नवीन वादाला सुरूवात झाल्याचं दिसतंय.
दोन दिवसांपूर्वी करूणा शर्मा यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला होता. आपण परळीत सासरी येऊन अनेक गोष्टींचा खुलासा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर आज करूणा शर्मा आपल्या मुलासोबत परळीत दाखल होताच त्यांना स्थानबद्ध करण्यात आलं आहे. त्यामुळे आता परळीत तणावाचं वातावरण तयार झालं आहे. आज सकाळी करूणा शर्मा बीडमध्ये दाखल झाल्या. त्यानंतर त्या आज परळीत दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेणार होत्या. मात्र, करूणा शर्मा दुपारी 2 वाजता परळीत पोहचल्या. परळीत दाखल होताच पोलिसांनी करूणा शर्मा यांना ताब्यात घेत स्थानबद्ध केलं आहे. त्यांच्या मुलाला देखील स्थानबद्ध केल्याचं कळतंय. त्यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्याची माहिती देखील समोर आली आहे.तर करूणा शर्मा यांनी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आल्यानं करूणा शर्मा यांच्यावर अँट्राॅसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, परळी येथील वैद्यनाथ दर्शनासाठी करूणा शर्मा गेल्या होत्या. मात्र या ठिकाणी आमच्या साहेबाला बदनाम करायला आलात का?, असा प्रश्न करत परळीच्या महिलांनी करूणा शर्माला अडवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्या ठिकाणी पोलीस पोहोचले आणि करूणा शर्मा यांची तपासणी केल्यानंतर त्यांच्या गाडीत पिस्तूल आढळून आलं. करूणा शर्माच्या गाडीत आढळून आलेले पिस्तूल हे त्यांचेच आहे का? तसेच त्या पिस्तूलाचं त्यांच्याकडे लायसन्स आहे का? याबाबतीत पोलीस अधिक तपास करीत आहेत. वैद्यनाथ मंदिराजवळ स्थानिक लोकांनी करूणा शर्मा यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या प्रकरणाबाबत आता चौकशी नंतर पोलीस काय भूमिका घेतात, हे आता पहावं लागणार आहे. तर मला अडचणीत आणण्यासाठी गाडीत पिस्तुल ठेवले असल्याचे करून शर्मा यांनी म्हटले आहे.