शेती
पंचनामे न करता सरसकट मदत करा – रोहित भैय्या पंडित…….!
गेवराई दि.८ -( देवराज कोळे) गेवराई तालुक्यात गेल्या दहा दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यासोबतच सर्वच मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याने पिकांसोबत जमीनीवरील मातीही वाहून गेली आहे. त्यामुळे कोणतेही पंचनामे करीत बसण्यापेक्षा शासनाने शेतकऱ्यांना सरसकट भरीव आर्थिक मदत करावी अशी मागणी शिवसेना युवा नेते रोहित पंडित यांनी केली आहे.
बीड जिल्ह्यातील सर्वाधिक पावसाची नोंद गेवराई तालुक्यात झाली असून, तालुक्यातील शेतकर्यांच्या तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला आहे. शेतात उभी असलेली कापूस, सोयाबीन, ऊस, तूर, मुग आदी पिकांसह सीताफळ, डाळिंब, मोसंबी, पपई आदींच्या बागाही भुईसपाट झाल्या आहेत. जोरदार अतिवृष्टी झाल्याने शेतातील पिकांसोबत जमिनीवरील मातीही वाहून गेली आहे. अनेक गावातील पाझर तलाव फुटले आहेत त्यामुळेही शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. नदी, नाल्यावरील पूल वाहून गेले आहेत. रस्ते उखडले आहेत. अशा स्थितीत शेतकऱ्यांचे कधीही भरून न निघणारे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने कसलेही पंचनामे न करता शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत करावी अशी मागणी शिवसेना युवा नेते रोहित पंडित यांनी केली आहे. दरम्यान, सध्या प्रत्येक गावात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. गावागावात सर्वत्र पाणीच पाणी दिसत आहे. कित्येक गावांचा संपर्क तुटला आहे. त्यातच पुन्हा हवामान खात्याने आणखी पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला आहे. अशा स्थितीत गावकर्यांनी आपली व आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी असे आवाहनही रोहित पंडित व रोहित भैय्या पंडित मित्र मंडळाच्या वतीने केली आहे.