धक्कादायक……..आंदोलन केले म्हणून विष पाजले…….!
बीड दि.१३ – जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात एक खळबळजनक घटना घडली आली आहे. एका कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यानं कंपनीविरोधात आंदोलन केल्याच्या रागातून कंपनीच्या मालकानं त्याला भयंकर शिक्षा दिली आहे.संबंधित कर्मचाऱ्याला आरोपींनी आधी त्रास देऊन नोकरीवरून काढलं आणि त्यानंतर जबरदस्तीनं विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी कंपनीच्या मालकासह चौघांवर अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. संतोष गजानन आमले असं 35 वर्षीय फिर्यादी कर्मचाऱ्याचं नाव असून तो आष्टी तालुक्यातील अंभोरा येथील रहिवासी आहे.
आमले हे कॅनफॅक्स कंपनीत ऑपरेटर म्हणून काम करत होते. परंतु संतोष यांनी काही दिवसांपूर्वी कर्मचाऱ्यांना पगारवाढ मिळावी म्हणून कंपनीविरोधात आवाज उठवला होता. संतोष यांच्या आंदोलनाचं फलित म्हणजे कर्मचाऱ्यांचा पगार वाढला. पण कंपनीच्या विरोधात आंदोलन केल्याचा राग कंपनीच्या मालकाला आणि वरिष्ठांना आला होता.आणि याच रागातून कंपनीचा मालक सुभाष मुथा आणि इतर अधिकाऱ्यांनी संतोष यांना सतत त्रास द्यायला सुरुवात केली. खोटा आरोप करून आरोपींनी संतोषला कामावरून काढून टाकलं. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर 3 सप्टेंबर रोजी कंपनीचा मालक सुभाष मुथा याच्या सांगण्यावरून कंपनीचे अधिकारी संदीप धोंडिबा सुरवसे, विकास विठ्ठल होले आणि बापूसाहेब सीताराम गायकवाड या तिघांनी संतोष यांना जबरदस्तीनं विष पाजलं आहे.