जागेच्या उताऱ्याची नक्कल मागण्यास आलेल्या महिलेचा विनयभंग…..!
केज दि.9 – राहत्या जागेच्या उताऱ्याची नक्कल मागण्यास आलेल्या एका ३६ वर्षीय महिलेचा ग्रामसेवकाने बीडीओंकडे तक्रार का केली असे म्हणत विनयभंग केल्याची घटना युसुफवडगाव ( ता. केज ) पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
केज तालुक्यातील एका गावातील ३६ वर्षीय महिला ही २७ जुलै रोजी दुपारी २ वाजेच्या नंतर राहत्या घराच्या जागेच्या उताऱ्याची नक्कल मागण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात गेली. यावेळी ग्रामसेवक हे ग्रामपंचायतीत एकटेच कामकाज करीत बसले होते. त्यांनी महिलेस काम विचारून बसण्यास सांगितले. महिला ही त्यांच्या समोरच्या खुर्चीत बसली असता ग्रामसेवकाने उठून गावातून कोणी तक्रार केली नाही. तू महिला असून माझी बीडीओंकडे तक्रार का केली ? असे म्हणत विनयभंग केला. घडलेला प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली. बदनामीपोटी महिलेने घडलेल्या प्रकाराची वाच्यता केली नाही. त्यानंतर ७ ऑगष्ट रोजी पीडित महिलेने वरील फिर्याद दिल्यावरून संबंधित ग्रामसेवकाविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.