केज पोलीस ठाण्याचे प्रमुख सपोनि शंकर वाघमोडे यांनी काळेगावघाट ( ता. केज ) येथे राजरोसपणे सुरू असलेल्या अवैध धंद्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, पोलीस नाईक दिलीप गित्ते, महादेव बहिरवाल, संतोष गित्ते, इंगोले यांच्या पथकाने १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.३५ वाजेच्या सुमारास छापा मारला असता काळेगावघाट ते उत्तरेश्वर पिंपरी रस्त्याच्या पुर्वेस शिवाजी नावाचे किराणा दुकानासमोर बन्सी शिवाजी आगे ( रा. काळेगाव घाट ) हा व्यक्ती लाल पिशवीत देशी दारूच्या २२ बाटल्या व विदेशी दारूची एक बाटली ठेवून चोरटी विक्री करीत असल्याचे निदर्शनास आले. तो पोलिसांना पाहून पिशवी खाली टाकून पळून गेला. पोलिसांनी ही ९२० रुपयांची दारू जप्त केली. त्यानंतर पथकाने बस स्थानकावर छापा मारला असता हनुमंत पांडुरंग सुरवसे ( रा. काळेगाव घाट ) हा कल्याण नावाचा मटका घेत असताना रंगेहाथ पकडले. तर मटका खेळणारे लोक पोलिसांना पाहून पळुन गेले. त्याच्याकडून मटका जुगाराचे साहित्य व नगदी ८८० रुपये जप्त केले. पोलीस नाईक दिलीप गित्ते यांच्या फिर्यादीवरून बन्सी शिवाजी आगे व हनुमंत पांडुरंग सुरवसे या दोघांविरुद्ध दोन वेगळे गुन्हे दाखल केले आहेत.