संपादकीय
केज शहरात शेकडो अनाधिकृत बांधकामांना नगरपंचायत ची मूक संमती…..!
केज दि.३१ – शहर झपाट्याने वाढत आहे. शहराच्या चारी बाजूने मोठमोठ्या इमारती होत आहेत आणि शहराची लोकसंख्या ही त्याच प्रमाणामध्ये वाढत आहे. मात्र मागच्या काही वर्षांपासून बांधकाम परवाना मिळवणे अवघड झालेले आहे. आणि त्यातली त्यात इनामी जमिनीवर किंवा वादग्रस्त भूखंड असेल तर त्या ठिकाणी बांधकाम परवाना मिळतच नाही.मात्र असे असतानाही केज शहरांमध्ये चारी बाजूने कसल्याही प्रकारचा नगरपंचायतचा बांधकाम परवाना न घेता मोठ्या प्रमाणावर घरे बांधायला सुरू आहेत. याकडे ना नगरपंचायतचे लक्ष आहे ना इतर कुठल्या प्रशासनाचे.
शहरातील बीड रोड आंबेजोगाई रोड कळंब रोड आणि धारूर रोड हे केज शहरातील मुख्य चार भाग आहेत. आणि त्या चारी रस्त्याच्या बाजूला मोठ मोठ्या वसाहती झालेल्या आहेत. तर केज शहराच्या मध्यभागी आणि आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर इनामी जमीन आहे. मागच्या काही दिवसांपर्यंत इनामी जमिनीवर अपवाद वगळला तर काही बांधकामे झालेली होती. मात्र मागच्या कांही दिवसांपासून इनामी जमिनीवर ही मोठ्या प्रमाणावर बांधकाम सुरू आहे. मग प्रश्न असा आहे की, या बांधकाम धारकांना नगरपंचायतचा बांधकाम परवाना आहे का ? आणि नसेल तर हे बांधकाम सुरू असताना नगरपंचायत अनाधिकृत बांधकाम म्हणून त्याच्यावर कारवाई का करत नाही ? एवढेच नव्हे तर इनामी जमिनीवर कसल्याही प्रकारची एनओसी न घेता मोबाईल चे टॉवर सुद्धा उभे राहिलेले आहेत. त्यांना विद्युत पुरवठाही केला जातो. घर बांधायचे असेल आणि पूर्ण कागदपत्र जरी स्पष्ट असतील तरीही बांधकाम परवाना मिळवण्यासाठी 100 चकरा नगरपंचायत कडे माराव्या लागतात. आणि मग हे जे शेकडो बांधकामं केज शहरांमध्ये सुरू आहेत त्याकडे नगरपंचायतचे दुर्लक्ष का होत आहे ? असा सर्वसामान्य नागरिकांना पडलेला प्रश्न आहे.
सदरील अनाधिकृत बांधकामामुळे नगरपंचायत चा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे, याचीही परवा स्थानिक प्रशासनाला राहिली नाही. मोठमोठ्या इमारती या इनामी जमिनीवर उभ्या राहू लागलेल्या आहेत. एवढे सर्व असतानाही त्याकडे पद्धतशीरपणे दुर्लक्ष केल्या जात असल्याने सर्वसामान्य नागरिक संभ्रमात आहेत.