#Crime

कला केंद्रातील नर्तिकेचा खून करून प्रेताची विल्हेवाट लावल्या प्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल….!

11 / 100
केज दि.२४ – तालुक्यातील केज-बीड रोडवर असलेल्या एका कला केंद्रात काम करीत असलेल्या नर्तिकेचा तिला लॉजवर नेऊन तिच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून व नाक तोंड दाबून खून केला. मात्र सदर प्रकरणी पोलिसांना माहिती न देता मयत महिलेच्या नातेवाईकांना भीती दाखवून गुपचूप प्रेताची विल्हेवाट लावून पुरावा नष्ट केल्याचा प्रकार उघडकीस आला. अडीच महिन्या नंतर या खुनाला वाचा फुटली असून मयताच्या आईच्या फिर्यादी वरून खून करून पुरावा नष्ट करणे व धमकी दिल्या प्रकरणी खून करणाऱ्या सह त्याला मदत केल्या प्रकरणी केंद्राचे मालक, मॅनेजर, लॉजचा मॅनेजर यांच्यासह सहा जणांविरुद्ध विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.
         अधिक माहिती अशी की, परभणी जिल्ह्यातील  येथील ५५ वर्षीय अनुसूचित जातीची महिला ही तिच्या दोन मुलीसह केज-बीड रोडवरील ढाकणे यांच्या रेणुका कला केंद्रात संगीत बारीत नाचकाम करून उपजीविका करीत होत्या. त्यांची मुलगी हिचे लग्न झालेले होते व ती गरोदर असताना तिच्या नवऱ्याचे कोरोनाने निधन झाले होते. तिला त्याच्यापासून एक ४ वर्षाचा मुलगा आहे. त्यांच्या पार्टी सोबत रेणुका कला केंद्राचे मालक यांच्यात करार झाला होता. त्यांनी मालकाकडून पाच लाख रु. उचल घेतली होती. पीडिता ही या कला केंद्रावर नृत्य करीत असल्याने तिची ओळख हिंगोली जिल्ह्यातील डिग्रस येथील गजानन उर्फ गज्जू कराळे याच्या सोबत झाली होती. गजानन उर्फ गजु हा अधुन मधुन हिला भेटण्यासाठी रेणुका कलाकेंद्र येथे येत होता. भेटण्यासाठी येताना तो मुलगी हीस किराणा सामान, तसेच मुलगी हिचा मुलगा यास  खाऊ आणत होता. त्यातुन मुलगी व गजानन उर्फ गजु याची जवळीक झाली होती. गजानन उर्फ गजु कराळे हा रेणुका कलाकेंद्र येथे आल्या नंतर तो तिला बरड फाटा येथील  लॉजवर  घेऊन जात असे व तिला लॉजवर घेऊन जाण्यासाठी तो कलाकेंद्र मालक यांना ३ हजार १००रु. देत असे. गजानन याने पीडितेस रेणुका कलाकेंद्र येथे, मालक  यांना उचलीचे पैसे देवुन तिला कायमस्वरुपी घेवुन जाईल असे सांगीतले होते. त्या पोटी गजानन उर्फ गजु याने रामनाथ ढाकणे यांना मागील वर्षी डिसेंबर २०२२ मधे १ लाख २०  हजार रु.चा चेक देखील दिला होता. गजानन हा त्याचा मित्र घुगे याचे सोबत रेणुका कलाकेंद्र येथे येत होता. गजानन उर्फ गजु यास  हिचे इतर लोकां सोबत देखील  संबंध असल्याचा संशय यायला लागला होता. त्यातुन एकदा गजानन कराळे व त्याचा मित्र घुगे असे रेणुका कलाकेंद्र येथे आले तेव्हा पीडितेची व गजानन कराळे या दोघात शाब्दिक बाचाबाची झाली होती.
             नंतर सुमारे सव्वा दोन महिन्या पूर्वी अमावस्येच्या दिवशी  रात्री १:३० वा च्या सुमारास गज्जू उर्फ गजानन कराळे गाडीतून पीडितेस रेणुका कला केंद्रातून घेऊन लॉजवर गेला. पीडित ही सकाळी परत आली नाही म्हणून तिच्या आईने  चौकशी केली असता ती लवकर येईल असे सांगितले. त्या नंतर ९:३० च्या दरम्यान याच कला केंद्रावर काम करणारी महिला  पीडितेच्या आईला व मोठ्या बहिणीला सोबत घेऊन गणेश ढाकणे यांच्या सोबत लॉजवर गेली आणि त्यांनी वरच्या मजल्यावर रूममध्ये जाऊन पाहिले असता पीडित ही पलंगावर मृतावस्थेत आढळून आली. तिच्या गळ्यावर कंठस्थानी शस्त्राचा वार करण्यात येऊन तिचा खून झालेला होता. या बाबत त्यांनी लॉजचे मॅनेजर यांच्याकडे चौकशी केली असता तिचा सोबत लॉजवर मुक्कामी असलेला गज्जू उर्फ गजानन कराळे हा पहाटे टूथ पेस्ट आणण्याच्या बहाण्याने मोटार सायकल घेऊन फरार झाला असल्याचे समजले. त्या नंतर मयतेच्या आई व बहिणीने पोलिसाना माहिती देण्याचे म्हणताच तिच्या हातातील मोबाईल लॉजवरील महिलेने हिने हिसकावून घेतला आणि पोलिसात तक्रार दिल्यास तुम्हाला त्रास होईल व तुम्ही जेलात जाल अशी धमकी दिली. मयत हिची आई व बहीण अशिक्षित असल्याने त्या घाबरून गेल्या त्या नंतर गणेश याचे चारचाकी वाहनात हिचे प्रेत शालीत गुंडाळुन रामनाथ ढाकणे, राठोड, वसुदेव सारूक यांनी टाकले. त्यानंतर प्रेत घेवुन मयतेचि आई, बहीण, तिचा लहान मुलगा यांना सोबत घेऊन सदरील महिला, गणेश ढाकणे, कला केंद्र मालक रामनाथ ढाकणे यांनी परभणी जिल्ह्यातील त्यांच्या गावी येथे गेले आणि तिथे तिच्यावर अंत्यसंस्कार करून खुनाचा पुरावा नष्ट केला.
              मात्र १५ दिवसा नंतर पीडितेच्या आईने पुन्हा पोलिसात तक्रार देण्याची ईच्छा व्यक्त करताच ही घटना कोणाला सांगू नका. असे म्हणून त्यांना धमकी देण्यात आली. तसेच हिला चक्कर आल्याने ती कपाटावर पडून तिचा मृत्यू झाला अशी खोटी माहिती गावी नातेवाईकांना दिली. तब्बल सव्वा दोन महिन्या नंतर मयतेच्या आईने सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांची भेट घेऊन हा प्रकार त्यांच्या कानावर घातला. त्या नंतर दि. २४ ऑगस्ट रोजी मध्यरात्री ३:०० रेणुका कला केंद्रातील नृत्यांगना हिला लॉजवर नेऊन तिचा भोकसून व नाक तोंड दाबुन खून करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेहाची विल्हेवाट लावल्या प्रकरणी गज्जू उर्फ गजानन शिवराम कराळे (रा. डिग्रज जि. हिंगोली), रामनाथ ढाकणे, (रा. सारूळ ता. केज), शमिम भाभी, (रा. परभणी), वासुदेव सारूक (रा.जोला ता. केज), लॉजचा मॅनेजर राठोड ( रा. वसमत जि. हिंगोली) आणि घुगे ( रा. परभणी ) या सहा जणांच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गु. र. नं. ५०३/२०२३ भा. दं. वि. ३०२, ३०१, १२० (ब), २१२, ३७०, ५०६ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
            दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार राठोड, अतिरिक्त पोलीस अधीक्षक कविता नेरकर-पवार, सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार हे पुढील तपास करीत आहेत.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close