राजकीय
प्रदेश काँग्रेसचा नागपूर येथे उद्या हल्लाबोल मोर्चा – सुरेश यादव…..!
नागपुर दि.१० – येथे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. राज्यातील शेतकरी, शेतमजूर,शिक्षण अनुदान, जुनी पेन्शन, आश्रम शाळा वेतनश्रेणी अनुदान, पिक कर्ज सिबिल अट, विद्युत लोडशेडींग तसेच इतर विषयांच्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सर्व सेल विभागाच्या वतीने सोमवारी नागपूर विधान भवन येथे नाना पटोले (प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस) यांच्या नेतृत्वाखाली हल्लाबोल मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती सुरेश यादव (प्रदेश प्रमुख विज्ञान-तंत्रज्ञान कौशल विकास विभाग) यांनी दिली आहे.
यावर्षी खरीप हंगामात सुरुवातीला झालेली अतिवृष्टी नंतर पावसाचा पडलेला खंड, तसेच गुलाबी बोंड आळीचा प्रादुर्भाव, जंगली जनावरांचा हैदोस, सततची विद्युत लोड शेडिंग यामुळे कापूस, सोयाबीन, धान, तूर इत्यादी पिके पूर्णतः उध्वस्त झाले. आणि आता पडलेला अवकाळी पाऊस व गारपिटीने उरले सुरले खरीप हंगामाची पिके मोठ्या प्रमाणात उध्वस्त झाली आहेत. तसेच रब्बी हंगामातील धान, गहू, हरभरा या पिकासह संत्रा, द्राक्ष, आंबा, डाळिंब, पपई, केळी, ऊस या पिकांचे देखील प्रचंड नुकसान झाले आहे.
नवीन आकृतीबंध नुसार मंजूर असलेल्या सर्व विभागातील रिक्त पदांची भरती करावी, राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, ग्रामरोजगार सेवक यांच्या प्रलंबित मागण्या त्वरित मंजूर कराव्यात. सामाजिक प्रश्नांची सोडवणूक करण्याकरिता जात निहाय जनगणना करावी. अशा जनतेच्या रास्त अपेक्षा सरकार कडे आहेत. परंतु केंद्र व राज्य सरकारच्या नियतीत सहकार्य भावना दिसत नाही. खरीप हंगामातील नुकसान झालेल्या पिकासाठी दुष्काळ जाहीर केला जात नाही, शासन स्तरावरून कोणतीही आर्थिक मदत अथवा पीक विमा देखील दिला नाही. तसेच वाढती महागाई बेरोजगारी यामुळे सर्वसामान्य जनतेचे देखील जगणे कठीण झाले आहे. म्हणून तीन पदरी चालाख सरकारच्या विरोधात आवाज उठवण्याची वेळ आली आहे. म्हणून सोमवार दिनांक 11 डिसेंबर 2023 रोजी सकाळी अकरा वाजता दीक्षाभूमी ते मॉरिस कॉलेज टी पॉइंट नागपूर येथे येथे तमाम महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी होत आहेत. तरी सर्व सेलच्या कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन सुरेश यादव यांनी केले आहे.