#Social
बीडचा ओबीसी आरक्षण एल्गार मेळावा ठरणार ऐतिहासिक….!
केज दि.8 – अखिल भारतीय समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रीय नेते नामदार छगनरावजी भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात ओबीसी, भटके विमुक्त आरक्षण बचाव एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. येत्या 13 जानेवारीला बीड येथे मेळावा होणार असून सदरील मेळावा हा ऐतिहासिक होण्यासाठी सकल ओबीसी समाज पेटून उठला असून रेकॉर्ड ब्रेक मेळावा होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर परिश्रम घेत आहेत.
येत्या 13 जानेवारी रोजी बीड येथे ओबीसी, भटके विमुक्त आरक्षण बचाव एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. आणि त्याच अनुषंगाने बीड जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सदरील मेळाव्याची चर्चा आहे. सदरील मेळावा यशस्वी करण्यासाठी आणि लाखोंच्या संख्येने ओबीसी समाज एकवटण्यासाठी ओबीसी समाजाचे नेते तसेच कार्यकर्ते गावागावात जाऊन जनजागृती करत आहेत. बीड जिल्ह्यातीलही संपूर्ण गावांमध्ये जाऊन ओबीसी समाजाचे कार्यकर्ते ठीक ठिकाणी बैठका घेत आहेत. केज तालुक्यातील अनेक गावात आतापर्यंत बैठका झाल्या असून कानडी माळी, चिंचोली माळी यासह अनेक गावांमध्ये समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष ऍड. सुभाष राऊत हे ठीक ठिकाणी बैठका घेत आहेत. शनिवारी कानडी माळी येथे ऍड. राऊत यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली आणि रविवारी तालुक्यातील चिंचोली माळी येथेही बैठक संपन्न झाली. यावेळी ओबीसी समाजातील अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. बीडच्या मेळाव्यासाठी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचा निर्धार या बैठकीमध्ये करण्यात आला.
दरम्यान, एक दिवस समाजासाठी या अनुषंगाने संपूर्ण ओबीसी समाज हा 13 तारखेच्या मेळाव्याची जय्यत तयारी करत असून ठीक ठिकाणी जाऊन जनजागृती करताना दिसत आहे. सदरील सभेला संपूर्ण ओबीसी समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सकल ओबीसी समाजाकडून करण्यात येत आहे.