क्राइम
पोलिसांच्या गाडीवर जमावाचा हल्ला….!
केज दि.१७ – पोलीस एका गुन्ह्यातील आरोपीला घेऊन जात असताना त्यांच्या वाहनाचा जमावाने पाठलाग करून वाहन अडवून दगड व लोखंडी रॉडने हल्ला करून गाडीच्या काचा फोडल्या. तर आतील पोलीस कर्मचाऱ्यांना भर चौकात मारहाण करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार केज येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात घडला आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार ज्ञानेश्वर बेल्हेकर आणि त्यांचे सहकारी पोलिस हवालदार प्रविण इंगळे, पोलिस शिपाई कुलदिप घोळवे हे स्कार्पिओ या वाहनाने वाहन क्र. (एम एच १६/ सी व्ही ५५५५) केज येथे आले. त्यांनी केज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वाघमारे यांना सोबत घेऊन एका जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद असलेला आरोपी प्रतिक भैरवनाथ चाळक यास तपासकामी ताब्यात घेण्यासाठी लव्हूरी येथे गेले होते. त्या वेळी प्रतिक चाळक आणि त्याचे सोबतचे इतर साथीदार हे एका गाडी च्या बॉनेटवर केक ठेवून कुणाचा तरी वाढदिवस साजरा करीत होते. त्या नंतर दि. १६ फेब्रुवारी रोजी दुपारी २:०० वा. च्या सुमारास जामखेड पोलीस हे त्यांच्या खाजगी वाहनाने आरोपी प्रतीक चाळक यास घेऊन निघाले असता २० ते २५ जणांनी स्कॉर्पिओ गाडीने क्र (एम एच-४४/झेड-२३००) यांनी पाठलाग करून त्यांना केज येथील शिवाजी चौकात गाडी आडवी लावून अडविले. त्या नंतर जमावातील एकाने हातातील लोखंडी रॉड व दगड पोलिसांच्या गाडीवर मारून काचा फोडल्या आणि आतील पोलीस हवालदार प्रवीण इंगळे यांचे गचुरे धरून मारहाण केली. तसेच पोलीस हवालदार ज्ञानेश्वर बेल्हेकर यांना चापटाने मारहाण करुन पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपी प्रतिक चाळक यास बाहेर ओढण्याचा प्रयत्न करुन सरकारी कामात अडथळा निर्माण केला. पोलीस शिपाई कुलदीप घोळवे यांना देखील चापटाने मारहाण करुन त्यांच्या गाडीचा खाजगी चालक विशाल कांबळे याला बाहेर ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकाने शिताफीने त्यांची गाडी पुढे घेवुन ती केज पोलीस ठाणेचे गेट मधुन आतमध्ये घेवुन गेला.
दरम्यान, पोलीस हवालदार बेल्हेकर यांच्या फिर्यादी वरुन दि. १६ फेब्रुवारी रोजी केज पोलीस ठाण्यात अभिषेक सावंत, ईश्वर चाळक, राहुल चाळक, सौरभ चाळक, रोहीत चाळक, मुन्ना बचाटे सर्व रा. ल व्हूरी ता. केज व अनोळखी तीन इसम अशा नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील हे पुढील तपास करीत आहेत.