शेती
जिल्हा कृषी महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – सागर पठाडे…..!
केज दि.२० – महाराष्ट्र शासन कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा बीड आयोजित बीड जिल्हा कृषी महोत्सव २०२४ या महोत्सवाचे बीड येथे पाच दिवस आयोजन करण्यात आले असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाची माहिती मिळावी व प्रगतीशील शेती करून भरघोस उत्पादन व आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी या उद्देशाने तालुक्यातील शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी सागर पठाडे यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी दीपा मुधोळ – मुंडे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर व प्रकल्प संचालक आत्मा सुभाष साळवे यांच्या सनियंत्रणाखाली बीड जिल्हा कृषी व महासंस्कृती महोत्सव २०२४ बीड येथे पाच दिवस संपन्न होणार आहे. शेतीतील अत्याधुनिक तंत्रज्ञान, शासकीय योजना तसेच शेतकरी ते ग्राहक असा थेट शेतमाल विक्री करता
येत आहे. कृषी पुरक उद्योगांची माहिती मिळणार आहे. या संधीचा फायदा घेऊन उत्पादन व व्यवसाय वाढीस चालना मिळणार आहे.
कृषी विभागाच्या वतीने महाराष्ट्रातील भव्य अशा कृषी महोत्सवाचे दि. २४ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी या कालावधीत छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण मल्टीपर्पज ग्राऊंड छत्रपती शिवाजी महाराज चौक बीड येथे कृषी महोत्सव संपन्न होणार असून यामध्ये शेतक-यांना नवतंत्रज्ञान मिळावे, कृषी प्रदर्शन, पशु प्रदर्शन, परिसंवाद, चर्चासत्र, उत्पादक ते ग्राहक थेट विक्री व्यवस्था, शेतकरी सन्मान समारंभ, आधुनिक कृषी अवजारे प्रदर्शन, शेतकरी उत्पादक कंपनी व सेंद्रिय शेती गट उत्पादित धान्य फळे फुले, भाजीपाला महोत्सव, आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाच्या निमित्ताने पिकांना प्रोत्साहन म्हणून माहिती मिळणार आहे. भव्य कृषी प्रदर्शन शेतकरी मेळावा, खरीददार, विक्रीदार संमेलन, शेतकरी मेळावा त्याचबरोबर खाद्य महोत्सव मेजवानी शेतकरी व भेट देणाऱ्या नागरिकांना मिळणार आहे. कृषी प्रदर्शनात भव्य अशा २०० दालनाद्वारे कृषी उत्पादनाची कृषी अवजारे प्रात्यक्षिके या प्रदर्शनास पाहावयास मिळणार आहेत.तसेच २५ फेब्रुवारी रोजी प्रदर्शनामध्ये श्वान, घोडे, पक्षी पाहावयास मिळणार आहेत. त्यासाठी पशुप्रेमींनी सदर महोत्सवात प्रदर्शनामध्ये पशु ठेवण्याकरिता नोंदणी करणे आवश्यक आहे.
दरम्यान, दररोज सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून कार्यक्रमांमध्ये गायन, नृत्य स्पर्धा, गीते, छत्रपती शिवाजी राजा महानाट्य व संगीत कार्यक्रम असे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. तसेच कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. तरी केज तालुक्यातील नागरीकांनी, शेतकरी बांधवांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी सागर पठाडे यांनी केले आहे.