#Cyber Crime
सिमकार्ड बंद होणार असल्याचे सांगत शेतकऱ्याचे पैसे केले ट्रान्स्फर, केज पोलिसात गुन्हा दाखल..……!
डी डी बनसोडे
February 10, 2021
केज दि.१० – एअरटेल कंपनीतून बोलत असल्याचे सांगून एका अनोळखी इसमाने शेतकऱ्यास तुमचे सिमकार्ड सुरू ठेवण्यासाठी मोबाईलवर पाठवलेल्या मॅसेजमधील लिंक ओपन करायला लावून २१ हजार रुपयांची रक्कम ट्रान्सफर करून घेत गंडा घातल्याचा प्रकार उमरी ता. केज येथे घडला. याप्रकरणी केज पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
केज तालुक्यातील उमरी येथील शेतकरी राजाभाऊ नामदेव सावंत यांच्या एसबीआय बँकेच्या केज शाखेतील खात्यावर २१ हजार ४०० रुपयांचे अनुदान जमा झाले होते. त्यांच्या मोबाईलवर १० जून २०२० रोजी मो. नं. ९८९००६३९११ या क्रमांकावरून अज्ञात व्यक्तीने फोन करून मी एअरटेल कंपनीतून बोलतोय. तुमचे सिमकार्ड बंद होणार आहे, सिमकार्ड चालू ठेवायचे असेल तर त्यासाठी तुमच्या मोबाईल नंबरवर एक मॅसेज येईल. तो मॅसेज आल्यानंतर त्यावर दिलेली लिंक ओपन करा असे सांगितले. त्यांनी ६२०२८९७३०७, ७३०४४४८३३७, ९२२३०११११२ या मोबाईल क्रमांकावरून आलेल्या मॅसेजमध्ये आलेली लिंक ओपन केली असता त्यांच्या बँक खात्यातून ५ हजार रुपये आणि ११ जून २०२० रोजी १६ हजार ४०० रुपये असे एकूण २१ हजार ४०० रुपये अज्ञात व्यक्तीने ऑनलाईन काढुन घेत त्यांची फसवणुक केली. फसवणूक झाल्यानंतर त्यांनी १२ नोव्हेंबर २०२० रोजी सायबर सेल, बीड यांच्याकडे तक्रारी अर्ज दिला होता. या प्रकरणाची चौकशी करून सायबर सेलने गुन्हा दाखल करण्यासंदर्भात केज पोलीस ठाण्याला पत्र दिले. त्यानुसार राजाभाऊ नामदेव सावंत यांच्या फिर्यादीवरून वरील मोबाईल क्रमांकाच्या अज्ञात व्यक्तींविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपासासाठी हे प्रकरण सायबर सेलकडे वर्ग करण्यात आले आहे.