सांडपाण्यात कोरोना विषाणू सापडल्याची माहिती……!
लखनऊ दि.26 – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक सुरु झाला असताना, त्याचा वाढता संसर्ग चिंतेचा विषय बनला आहे. त्यामुळे या विषाणूचा प्रसार कसा होत आहे, यावर वेगवेगळे अभ्यासक अभ्यास करत आहेत. त्यातच अनेक बाबी समोर आल्या आहेत. उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये सांडपाण्यात कोरोनाचे विषाणू आढळल्याची खात्री झाली आहे. यानंतर मात्र लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
एसजीपीजीआयच्या मायक्रोबायोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. उज्ज्वला घोषाल यांनी सांगितले की, देशात सांडपाण्याचे नमुने आयसीएमआर-डब्ल्यूएचओमार्फत तपासले जात आहेत. यात उत्तर प्रदेशमधील तीन वेगवेगळ्या ठिकाणाहून सांडपाण्याचे नमुने घेण्यात आले आहेत. त्यापैकी एका जागी सांडपाण्यात कोरोना विषाणू आढळल्याचं दिसून आलं आहे. मायक्रोबायोलॉजी विभागाच्या एचओडीने डॉक्टर उज्ज्वला घोषाल यांनी सांगितलं की, आमच्या टीमनं लखनऊतील वेगवेगळ्या ठिकाणाहून सांडपाणी चाचणीसाठी गोळा केलं होतं. ज्यामध्ये खदरा, मछली मोहल्ला आणि घंटाघर या ठिकाणाहून सांडपाण्याचे नमुने गोळा करण्यात आले. त्यापैकी रुद्रपूर खदरातील पाण्यात कोरोना विषाणू आढळल्याचं निष्पन्न झालं आहे. मात्र, यातून कोरोनाचा प्रसार होणार की नाही हा संशोधनाचा विषय आहे.
दरम्यान, डॉ. उज्ज्वला घोषाल यांनी पाण्यात आढळलेल्या नमुन्यांचा अहवाल भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेला सादर केला आहे. त्यांनी सांगितलं की, पाण्यात कोरोना विषाणू आढळण्याचं कारण कोरोनाबाधित लोकांची विष्ठा आहे. जे लोक कोरोनासंसर्ग झाल्यांनंतर घरी क्वॉरंटाईन होतात. त्या घरातील सांडपाण्यातून हा कोरोना व्हायरस बाहेर पडत आहे. अर्धा टक्के कोरोना रूग्णांच्या विष्ठेमध्ये कोरोना विषाणूची पुष्टी झाली आहे. अनेक देशांनी केलेल्या संशोधनात हे स्पष्ट झालं आहे.