केज दि.११ – विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेलेल्या २८ वर्षीय महिलेचा पाय घसरून विहिरीत पडल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना केज शिवारात घडली. अर्चना बालाजी घुले ( रा. टाकळी ता. केज ) असे विहिरीत पडून मरण पावलेल्या महिलेचे नाव आहे.
टाकळी येथील अर्चना बालाजी घुले ( वय २८ ) यांचे कुटुंब हे केज शिवारातील भगवान बाबा वस्तीवर शेतात वास्तव्यास आहे. ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी अर्चना घुले ही महिला वस्तीपासून जवळच असलेल्या विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेली. विहिरीतून पाणी काढीत असताना तिचा पाय घसरल्याने विहिरीत पडली. विहिरीला पाणी भरपूर असल्याने व तिला पोहता येत नसल्याने तिचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. पाणी आणण्यासाठी गेलेली अर्चना ही बराच वेळ झाला, तरी घरी परत न आल्याने नातेवाईकांनी विहिरीकडे धाव घेतली. ती विहिरीत पडल्याचे निदर्शनास आल्यानंतर रात्री उशिरापर्यंत प्रयत्न करून तिचा मृतदेह पाण्याबाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी पाठवून देण्यात आला. ९ ऑगस्ट रोजी केज येथील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. अशोक नवनाथ चौरे ( रा. बेलगाव ता. केज ) यांच्या खबरेवरून केज पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास जमादार प्रभाकर नखाते हे करीत आहेत.