संपादकीय
जवान मच्छिन्द्र मुळे यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार……!
केज दि.३ – तालुक्यातील उमरी येथील जवान हवीलदार मच्छिंद्र मुरलीधरराव मुळे यांच्यावर त्यांच्या उमरी या जन्मगावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले.
उमरी या गावचे जवान मच्छिन्द्र मुरलीधरराव मुळे हे भारतीय सैन्यदलात पुरवठा विभागात सेवारत होते. मंगळवारी छातीत दुखू लागल्याने त्यांना पुणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.मात्र रात्री उशिरा त्यांचे दुःखद निधन झाले.
बुधवारी त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच उमरी व पंचक्रोशीत शोककळा पसरली. बुधवारी रात्री साडेदहा वाजता त्यांचे पार्थिव उमरी या त्यांच्या जन्मगावी पोहोंचल्यानंतर गावातून ‘भारत माता की जय’, भारतीय सैनिकांचा विजय असो, ‘मच्छिन्द्र मुळे- अमर रहे, अमर रहे। या घोषणांनी गाव दणाणून गेले होते. रात्री साडेबारा वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी केज तालुका प्रशासनाच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. केज तालुका पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी पुष्पचक्र वाहून मानवंदना दिली. केज तालुका संघर्ष माजी सैनिक संघटना, तसेच शेतकरी कामगार पक्ष व ग्रामस्थांच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना देण्यात आली. रात्री साडेबारा वाजता उमरी गावातील आबालवृद्ध आपल्या गावच्या सुपुत्राला अंतिम निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने अंत्यसंस्कार ठिकाणी उपस्थित होते. केज तालुका संघर्ष माजी सैनिक संघटनेने अत्यंविधी ठिकाणी आवश्यक व्यवस्था केली होती.